Raj Thackeray : मृत्यूंजय, राजा शिवछत्रपती... राज ठाकरेंनी घेतली ५० हजारांची २०० पुस्तकं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 09:53 AM2022-05-18T09:53:22+5:302022-05-18T10:04:21+5:30
पुण्यात दाखल झालेल्या राज ठाकरे यांनी मंगळवारी अक्षरधारा बुक गॅलरीला भेट देत पुस्तकांची खरेदी केली.
मनसे प्रमुखराज ठाकरे गेल्या २ महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहेत. हिंदुत्त्वाची भूमिका, भोंग्याचा वाद आणि अयोध्या दौऱ्यामुळे ते माध्यमांचे आकर्षणही ठरत आहेत. स्पष्टवक्ते आणि परखडपणे बोलणारं व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरेंची ओळख आहे. याशिवाय त्यांचं पुस्तक प्रेमही सर्वांना ठाऊक आहे. मंगळवारी सायंकाळी शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पुस्तकांच्या दुकानाकडे धाव घेतली. अक्षरधारा बुक गॅलरी या ठिकाणी भेट देत त्यांनी ५० हजार रुपयांच्या तब्बल दोनशे पुस्तकांची खरेदी केली. त्याच्या या पुस्तक खरेदीमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती आणि इतर पुस्तकांचा समावेश आहे.
मंगळवारी अक्षरधारा बुक स्टॉलमध्ये बसून राज ठाकरे यांनी निवांत पुस्तकं चाळली. तसंच त्या ठिकाणाहून परतताना त्यांनी त्यांनी तब्बल ५० हजार रुपयांच्या पुस्तकांची खरेदी केल्याची माहितीही समोर आली आहे.
पुणे - जगू द्याल का नाही, राज ठाकरे पत्रकारांवर संतापले pic.twitter.com/qaLs8Tbvxa
— Lokmat (@lokmat) May 17, 2022
मंगळवारी रात्री आठच्या सुमारास राज ठाकरे यांनी अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली. यावेळी त्यांनी थोडा थोडका नाही, तर तब्बल दीड तास पुस्तकांच्या सानिध्यात घालवला. ऐतिहासिक, सामाजिक, आत्मचरित्र अशा अनेक प्रकरातील २०० पुस्तकं राज ठाकरे यांनी आपल्या बुक शेल्फसाठी निवडली.
Video: दुकानात जाताना राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, विचारला एकच सवाल
“राज ठाकरे यांनी बुक गॅलरीला भेट दिली. त्यांनी जवळपास दीड तास सर्व विषयांची पुस्तकं पाहिली. त्यांनी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक पुस्तकंही घेतली. चरित्र, आत्मचरित्र, सामाजिक विषयाची पुस्तकं, कलाविषयक पुस्तकंही त्यांनी विकत घेतली. जवळपास ५० हजार रुपयांपेक्षा अधिक २०० पुस्तकं त्यांनी घेतली,” अशी माहिती अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी दिली. अनेक पुस्तकं त्यांच्या संग्रहात होती. परंतु त्यापैकी काही हरवली किंवा त्यांनी कोणाला भेट दिली होती. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती, इतिहासकार सरदेसाई यांचे मराठी रियासत, वा सी बेंद्रे यांचा संपूर्ण संच, मृत्युंजय पुस्तकाची नवी आवृत्ती, यातील काही पुस्तके राज ठाकरे यांच्याकडे हो परंतु त्यांना नव्याने ही पुस्तके खरेदी करायची होती, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.