कोरोनाग्रस्तांच्या घरचे महावितरणने तोडले वीजजोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:52+5:302021-03-28T04:10:52+5:30
बारामती: महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम थेट आता कोरोना संक्रमित रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. घरातील कर्तीव्यक्ती कोरोनाग्रस्त असून देखील मुदत ...
बारामती: महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम थेट आता कोरोना संक्रमित रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. घरातील कर्तीव्यक्ती कोरोनाग्रस्त असून देखील मुदत न देता थकबाकी न भरल्यास वीजजोड तोडण्यात येत आहे. आधीच कोरोनाशी मुकाबला करताना घरदार मेटाकुटीला आले असाताना महावितरणच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या परिवार हतबल झाला आहे.
मागील काही दिवसांपासून महावितरणची थकबाकी वसुलीची मोहीम तीव्रपणे सुरू आहे. सर्वसामान्य कष्टकरीवर्गापासून ते अगदी शेतकरी, कारखानदार, लघु उद्योजकांकडून वीज बिलाची वसुली करण्यात येत आहे. उन्हाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र झाली होती. सर्वच स्तरातून महावितरणच्या या भूमिकेला विरोध झाल्यानंतर याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात देखील उमटले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत विजजोड तोडण्यात येणार नाहीत, अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यानंतर महावितरणने देखील सौजन्य दाखवत ‘वीज तोडून नाही तर हात जोडून करणार वसुली’ अशी मोहीम हाती घेतली. मात्र हे सौजन्य केवळ दिखाव्यापुरतेच होते की काय, असा अनुभव सध्या बारामती शहर व तालुक्यातील कोरोनाग्रस्त रूग्ण व त्यांचा परिवार घेत आहे. सध्या रूग्णसंख्या वाढत असल्याने काही रूग्ण घरीच विलगीकरणात आहेत. तर काही कुटुंबप्रमुख कोरोनाग्रस्त असल्याने शासकीय वा खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. महासाथीच्या या काळचा मुकाबला करताना काहीजन हतबल झालेले दिसतात. अशावेळी महावितरणचे वसुली पथक वीजबिल भरा, अन्यथा वीजजोड तोडू असा इशारा देते. यावेळी आमची परिस्थिती समजून घ्या. घरातील कर्ती माणसे कोरोनाग्रस्त आहेत. मुदत वाढवून द्या, अशी केलेली विनंती देखील महावितरणचे अधिकारी धुडकावून लावत आहेत व वीजजोड तोडत आहेत.
----------------
आमच्या घरातील चार व्यक्ती सध्या कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी तीनजणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आमची वीजबिलाची काही रक्कम थकीत आहे. ज्यावेळी महावितरणचे पथक घरी वीजजोड तोडण्यासाठी आले त्यावेळी आम्ही सध्याची परिस्थिती त्यांना सांगितली. तसेच कोरोनापासून मुक्त झाल्यानंतर एक किंवा दोन टप्प्यामध्ये आपले थकीत वीजबिल भरण्याची तयारी देखील दर्शवली. मात्र आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने वीजजोड तोडत आहोत. कोणी व्यक्ती कोरोनाग्रस्त असो वा नसो आम्हाला आमचे काम करावे लागेल, असे उत्तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिले.
- राजेश मत्रे
बारामती
---------------
याबाबत बारामती परिमंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर, आम्ही त्याबाबत लवकरच सहकार्याची भूमिका घेऊ. थकीत बिलामध्ये ज्या व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे किंवा कुटुंबप्रमुख कोरोनाग्रस्त आहे, अशा कुटुंबाना मुदत वाढवून देण्यात येईल. तसेच सुलभ हप्त्यांमध्ये थकबाकी भरण्याची सोय करण्यात येईल, अशी माहिती दिली.
---------------------
माणुसकीच्या दृष्टीने आम्ही थकीत वीजबिल असलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या घरची वीज तोडू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असा एक प्रकार समोर आला होता. मात्र त्या कुटुंबाची पुन्हा जोडण्यात आली आहे.
- प्रकाश देवकाते
उपअभियंता, बारामती