महावितरणने छाटली विनापरवानगी झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:36+5:302021-05-29T04:09:36+5:30
धायरी येथील नगरसेविका अश्विनी पोकळे यांच्या पुढाकारातून दशक्रिया विधी परिसरात वृक्षलागवड मोहीम राबवून अनेक झाडांचे संगोपन करण्यात येत आहे. ...
धायरी येथील नगरसेविका अश्विनी पोकळे यांच्या पुढाकारातून दशक्रिया विधी परिसरात वृक्षलागवड मोहीम राबवून अनेक झाडांचे संगोपन करण्यात येत आहे.
या ठिकाणी गार्डन, प्ले एरिया त्याचबरोबर त्या परिसराचे सुशोभीकरणही सुरू आहे. अशातच महावितरण विभागाने महापालिकेची कोणतीच पूर्वपरवानगी न घेता परिसरातील झाडांच्या फांद्या तोडल्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते किशोर पोकळे म्हणाले की, झाडाच्या फांद्या तोडण्यास हरकत नाही. परंतु त्यांनी एक-दोन फूट झाडांच्या फांद्या तोडल्या असत्या तर हरकत नव्हती. मात्र त्यांनी आठ ते दहा फुटांपर्यंत झाडांच्या फांद्या तोडून टाकल्या आहेत.
कोट
वीजवितरण विभागाकडून झाडांच्या फांद्या तोडण्याबाबत कोणत्याही प्रकारचा लेखी अर्ज आलेला नाही. शिवाय आमच्या विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही.
- बाळासाहेब चव्हाण, वृक्षनिरीक्षक
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय
पावसामुळे अथवा जोरदार वादळामुळे झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडून वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. दरवर्षीप्रमाणे माॅन्सूनपूर्व झाडांच्या फांद्या आमच्या विभागाकडून काढण्यात येतात.
- दिनेश बडसे, सहायक अभियंता
वीजवितरण विभाग धायरी
तीन महिन्यांपूर्वी धायरी येथील दशक्रिया विधी परिसरातील वीजतारा भूमिगत करून घेण्याबाबत महावितरण विभागाला निवेदन दिले आहे. एकीकडे झाडे वाढविण्यासाठी आम्ही मेहनत घेतो आहोत, तर दुसरीकडे परस्पर विनापरवाना झाडांच्या फांद्या तोडल्या जातात.
- अश्विनी पोकळे, नगरसेविका