विद्युत रोहित्राच्या दुरुस्तीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू;सांगवीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 08:15 PM2020-08-11T20:15:28+5:302020-08-11T20:16:15+5:30
रोहित्रास बिघाड झाल्याने वीजपुरवठा झाला होता खंडित; स्थानिकांनी केली होती तक्रार
पिंपरी : विद्युत रोहित्राच्या दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला. यात हात व कमरेसह शरीराचा अर्धा भाग जळाल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. नवी सांगवी येथील फेमस चौक येथे मंगळवारी (दि. ११) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
हनुमंत नागनाथ भिसे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, लेन न. ३, पिंपळे गुरव, मूळ गाव - गोढाळा, ता. रेणापूर, जि. लातूर) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. भिसे यांच्या मागे पत्नी, दोन मुले असून, त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांची बहीण देखील राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नवी सांगवी येथील फेमस चौक येथील शनि मंदिराजवळ असलेल्या नरसिंह रेसिडेंसी या सोसायटीच्या लगत विद्युत रोहीत्र आहे. या रोहित्रास बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत स्थानिकांनी महावितरण कंपनीच्या जुनी सांगवी येथील शाखा कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या कार्यालयातील चार ते पाच कर्मचारी एका वाहनातून फेमस चौक येथे दाखल झाले. त्यावेळी लाइनमन हनुमंत भिसे आणि अन्य एक कर्मचारी रोहित्रातील बिघाडाची पाहणी करण्यासाठी वाहनातून खाली उतरले. रोहित्र उंचावर असल्याने लाइनमन भिसे वर चढले तर दुसरा कर्मचारी खाली थांबला होता. त्यावेळी भिसे यांना विजेचा धक्का बसून ते खाली पडले.
विजेच्या धक्क्याने भिसे यांचा एक हात तसेच कमरेला भाजले. शरीराचा अर्धा भाग जळाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, इतर कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत जुनी सांगवी येथील महावितरणच्या शाखा कार्यालयाचे उपअभियंता रत्नीदीप काळे यांना माहिती दिली. त्यानंतर उपअभियंता काळे यांनी सांगवी पोलिसांना माहिती दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.