महावितरणच्या कर्मचारी महिलेला कोंडणा-याचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:31+5:302021-03-20T04:11:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘आमची तोडलेली वीज पुन्हा चालू कर, नाहीतर मी तुला येथे कोंडून ठेवीन,’ असे धमकावत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘आमची तोडलेली वीज पुन्हा चालू कर, नाहीतर मी तुला येथे कोंडून ठेवीन,’ असे धमकावत महावितरणच्या कर्मचारी महिलेला मीटर रूममध्ये कोंडणा-याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने त्याची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सलीम बशीर सय्यद (वय ४१, रा. सुखनिवास, एस आर ए बिल्डिंग, मंगळवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी माधुरी सुनील कुलसंगे (वय २८, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवार पेठेतील सुखनिवास या एस. आर. ए. इमारतीत मंगळवारी (दि. १५) हा प्रकार घडला. सय्यद याचे ११ हजार ४८१ रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने फिर्यादी यांना दिलेल्या कामानुसार त्यांनी आरोपीच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे संतापलेला सय्यद फिर्यादीवर धावून गेला. मीटर रूमची बाहेरून कडी लावून त्याने फिर्यादीला कोंडून ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांनी कार्यालयातील सहाय्यक शैलेश धुमाळ यांना फोन करून बोलवून घेतले. धुमाळ यांनी त्यांची सुटका केली. सय्यद याने त्यांनाही शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला शुक्रवारी (दि. १९) न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास सरकारी वकील किरण बेंडभर यांनी विरोध केला. आरोपीने एका सरकारी कर्मचा-याच्या कामात अडथळा आणून त्यांना कोंडून ठेवले. हा गंभीर अपराध आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. बेंडभर यांनी केला.