महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, ५४ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:24+5:302021-03-26T04:12:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : थकीत वीजबिलांपोटी नियमानुसार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे शासकीय कर्तव्य बजावताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : थकीत वीजबिलांपोटी नियमानुसार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे शासकीय कर्तव्य बजावताना पश्चिम महाराष्ट्रात अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण, शिवीगाळ तसेच कार्यालयांची तोडफोड करण्याचे तीस प्रकार घडले. या प्रकरणी एकूण ८२ आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ५४ आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने जामीन नाकारल्याने काहीजण अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे.
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रात्रंदिवस सेवा देणारे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन वीजबिलांची थकीत रक्कम भरण्याची विनंती करीत आहेत. मात्र ती अव्हेरून अभियंता व कर्मचाऱ्यांनाच शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण करण्याचे तसेच काही ठिकाणी कार्यालयांची तोडफोड करण्याचे प्रकार घडत आहेत. याविरुद्ध महावितरणने कठोर पवित्रा घेतला असून आरोपींविरुद्ध संबंधीत पोलीस ठाण्यात तत्काळ फौजदारी तक्रारी दाखल करण्यात येत आहेत.
थकीत वीजबिलांचा भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. थकबाकीचा भरणा करण्यासाठी चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीजग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीजबिलांची तक्रार किंवा शंका असल्यास त्याचे देखील निरसन करण्यात येत आहे. तरीही वीजबिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची नाईलाजाने कारवाई करण्यात येत आहे. ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले.
चौकट
पुणे जिल्ह्यात ७ प्रकरणांत १६ आरोपींविरुद्ध तर कोल्हापूर जिल्ह्यात ६ प्रकरणांत ३४, सांगली जिल्ह्यात ३ प्रकरणांत ५, सोलापूर जिल्ह्यात ७ प्रकरणांत १३ व सातारा जिल्ह्यात ७ प्रकरणांत १४ आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांत आतापर्यंत एकूण ८२ आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी ५४ जणांना अटक करण्यात आली.