महावितरणचा उद्योजकांना दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:08 AM2018-10-24T01:08:33+5:302018-10-24T01:08:38+5:30

नुकत्याच दिवाळीच्या मुहूर्तावर आलेल्या वीजबिलांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ३० ते ४० टक्के एवढी प्रचंड दरवाढ केली आहे.

MSEDCL's Shock Increase to Entrepreneurs | महावितरणचा उद्योजकांना दरवाढीचा शॉक

महावितरणचा उद्योजकांना दरवाढीचा शॉक

Next

बारामती : नुकत्याच दिवाळीच्या मुहूर्तावर आलेल्या वीजबिलांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ३० ते ४० टक्के एवढी प्रचंड दरवाढ केली आहे. दरवाढ करून उद्योजकांना वीजदेयक बिले दिलेली आहेत. वीज वितरण कंपनीने केवळ १० ते १२ टक्के दरवाढ करण्याचे घोषित केले होते. मात्र, ३० ते ४० टक्के दरवाढ झाल्याने उद्योग क्षेत्रात नाराजी पसरली आहे. त्यातच वीज कंपनीने चुकीच्या पद्धतीने पॉवर फॅक्टर आकारणी करून हजारो रुपयांचा दंड अनेक उद्योजकांना लावलेला आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसाय मोडकळीस येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात केलेल्या वीजदरवाढीचा बारामती एमआयडीसीतील उद्योजकांनी एकत्र येत निषेध नोंदविला.
बारामती चेंबर आॅफ कॉमर्स व इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता पडळकर यांची उद्योजकांनी नुकतीच भेट घेतली. अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर यांना उद्योजकांनी चुकीच्या पद्धतीने आकारलेला पॉवर फॅक्टर दंड कमी करण्याची मागणी केली. तसेच, आकारलेल्या वीजदरवाढीमुळे महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यातील स्वस्त वीज दरामुळे बाजारात स्पर्धेसाठी कमी पडतील. परिणामी, हे उद्योग धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे दरवाढीमध्ये काही प्रमाणात तरी सवलत द्यावी. चुकीची बिले दुरुस्त करुन मिळावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. तसेच नवीन पॉवर फॅक्टर सूत्र अंमलबजावणीपूर्वी उद्योजकांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने केली. यावेळी वीज वितरण कंपनीचे सहायक कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, उद्योजक सचिन माने, पांडुरंग कांबळे, शहाजी रणवरे, कै लास शितोळे, भाऊसाहेब तुपे, आशिष पल्लोड, संजय थोरात, अरुण म्हसवडे, महावीर कुंभारकर, शफिक सय्यद, बाबासोा शेंडे, राजेंद्र साळुंके, नरेश तुपे, टेक्स्टाईल पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंकेश्वरकर, के बी गायकवाड,सुनील पाटील, कमलेश खेताम आदी उद्योजक उपस्थित होेते.
>वीजदर जवळपास १० रुपये प्रतियुनिट
वीज दरवाढीबाबत बारामती चेंबर आॅफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आॅटोमोबाईल उद्योग बऱ्यापैकी चाललेला असताना नुकत्याच झालेल्या या वीजदरवाढीमुळे मोडकळीस येण्याची भीती आहे. उद्योग क्षेत्रासाठी गुजरातमध्ये ६ रुपये २० पैसे प्रति युनिट, तर कर्नाटक मध्ये ७ रुपये ८० पैसे प्रतियुनिट वीज दर आहे.मात्र, या दरवाढीमुळे महाराष्ट्रात हाच वीजदर जवळपास १० रुपये प्रतियुनिट झाला आहे. मला साधारण १ लाख ४५ हजारांच्या आसपास येणारे वीजबिल १ लाख ८५ हजारांवर गेले आहे. यावरून वीजदरवाढीची तीव्रता लक्षात येते. तसेच पॉवर फॅ क्टर दंड आकारणी वीजबिलाएवढी करण्यात आल्याचे कुंभार यांनी सांगितले.
अधीक्षक अभियंता पडळकर यांनी, चुकीचा पॉवर फॅ क्टर लावलेली सर्व बिले दुरुस्त केली जातील. तसेच, जादा रक मेच्या भरलेल्या बिलांना पुढील बिलांमध्ये वजावट मिळेल, असे आश्वासन दिले आहे. नवीन पॉवर फॅक्टरबाबत उद्योजकांचे १ दिवसाचे प्रशिक्षण लवकरच घेऊ. ३ महिने मुदतीच्या मागणीचा उद्योजकांना प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू, असे आश्वासनदेखील पडळकर यांनी दिल्याचे चेंबर आॅफ कॉमर्सच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: MSEDCL's Shock Increase to Entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.