Mucormycosis: पुणे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात फक्त ८३ नवे रुग्ण; धोका झाला कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:28 PM2021-10-05T19:28:51+5:302021-10-05T19:29:10+5:30
एप्रिल 2021 मध्ये जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली.
पुणे: कोरोना रुग्ण संख्या कमी होत असतानचा म्युकरमायकोसिसचा धोका देखील कमी झाला आहे. मे-जुन महिन्यात आठवड्याला १०० च्या घरात सापडणारी रुग्ण संख्या आता चांगलीच कमी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात म्युकरमायकोसिस केवळ ८३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मृत्यू देखील कमी झाले आहेत.
कोरोनाच्या दुस-या लाटते मोठ्याप्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन्स, स्टेराॅईड आणि ऑक्सिजनच्या चुकीच्या पद्धतीने व अतिरेक वापर केल्याने रुग्णांवर अनेक दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. याचाच एक भाग म्हणजे म्युकरमायकोसिस हा आजार असून, पोस्ट कोविड रुग्ण या आजाराचे बळी ठरत आहे. म्युकरमायकोसिसमध्ये प्रामुख्याने डोळ्यावरच सर्वाधिक परिणाम होताना दिसत आहेत.
एप्रिल २०२१ मध्ये जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. परंतु थोड्याच दिवसांत यात मोठी वाढ झाली. जिल्ह्यात प्रशासनाने म्युकरमायकोसिस रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण केले. याचा चांगला परिणाम दिसून आला. या सर्वेक्षणामुळे मे महिन्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली. त्यानंतर जून महिन्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक ४२६ नवीन रुग्ण व तब्बल १११ मृत्यु झाले. म्युकरमायकोसिस रुग्णांना होणारे त्रास, त्यावरील उपचार आणि येणारे भरमसाठ बिल यामुळे कोरोना परवडला पण म्युकरमायकोसिस नको अशी म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली. म्युकरमायकोसिस रुग्ण संख्येत वाढ सुरू झाल्यानंतर बहुतेक सर्व हाॅस्पिटल व नातेवाईकांनी रेमडेसिविर इंजेक्शन्स वापर टाकण्यास सुरुवात केली. याचा चांगला परिणाम झाला व जुलै महिन्यात दर आठवड्याला संख्या कमी कमी होत गेली.
जिल्ह्यात आता पर्यंत १४८७ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले असून, उपचार घेऊन १ हजार १११ रुग्ण बरे देखील झाले आहेत. तर सध्या १५९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर म्युकरमायकोसिस आजारामुळे २१७ रुग्णांनी आपला जीव गमवला आहे.