आळंदीकरांना मैलायुक्त पाण्याचा पुरवठा
By admin | Published: May 3, 2017 01:47 AM2017-05-03T01:47:48+5:302017-05-03T01:47:48+5:30
अलंकापुरीतील गहन बनत चाललेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीची तहान भागविण्यासाठी आंद्र्रा धरणातून २०० क्युसेक्सने
शेलपिंपळगाव : अलंकापुरीतील गहन बनत चाललेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीची तहान भागविण्यासाठी आंद्र्रा धरणातून २०० क्युसेक्सने इंद्रायणीत पाणी सोडण्यात आले आहे. मात्र,आळंदीकर कारभारी व शिवसेना आपल्याच विनंतीने आळंदीकरांच्या पिण्यासाठी पाणी सोडल्याचा दावा करत आहे. प्रत्यक्षात आळंदीच्या धरणात अद्याप आंद्र्राचे पाणी आले नाही. त्यामुळे आळंदीकरांच्या बंद नळाला मैलायुक्तच पाणी येत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या चिखली, तळवडे हद्दीतून पिंपरी-चिंचवडचे मैलायुक्त सांडपाणी थेट नदीत सोडल्याने आळंदीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील बनत आहे. सध्या आळंदीतील इंद्रायणी कोरडी पडल्याने पाणीपुरवठ्याच्या
बंधाऱ्यावर संपूर्णपणे मैलायुक्त गाळ साचला आहे. त्यातूनच अपुऱ्या यंत्रणेवर पाणी शुद्ध करावे लागत असल्याने मागील ८ दिवसांपासून आळंदीत नळाला मैलायुक्त पिण्याचे पाणी येत आहे.
नळाचे पाणी पिण्यायोग्य तर सोडा आंघोळीच्याही लायकीचे नसल्याचे चित्र आहे. प्रभारी मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आदींच्या प्रयत्नाने पाण्याचा थोडाफार रंग बदलला होता. परंतु चव मात्र तीच असल्याने पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी विकतचे पाणी वापरण्याची पाळी आळंदीकरांवर आली आहे.
नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या पुणे शाखेला शनिवारी (दि. २९) पत्रव्यवहार करून आळंदीला वडिवळे अथवा जाधववाडी धरणातून पाणी सोडण्याबाबत ई-मेल केल्याची माहिती पत्रकारांना पत्राद्वारे दिली होती. प्रत्यक्षात २५ तारखेलाच आंद्र्रा धरणातून पाणी सोडले होते. मात्र, शिवसेना पाणी सोडण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला असल्याचे सोशल मीडियावर सांगत आहे. आळंदीत नागरिकांनी नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. पिण्याचे पाणी आळंदीकरांना मिळवून देऊ, यासाठी सेना-भाजपा यांनी दोन्हीकडून दावा केला जात होता. (वार्ताहर)
मावळ पाटबंधारे विभागातील शाखाधिकारी ए. आर. हांडे यांना विचारले असता, २५ एप्रिलला आंद्रा धरणातून आळंदी परिसरातील शेतीसाठी पाणी सोडले आहे. याबाबत मोशी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडण्याची सूचना आली होती. सुमारे दोनशे क्युसेक्स पाणी सोडले असून मंगळवारी रात्रीपर्यंत आळंदीत पाणी पोहोचेल. चिंबळी, मोई, धानोरे, मरकळ, चऱ्होली या भागातील शेतकऱ्यांबरोबर आळंदीच्या पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होईल, असे हांडे यांनी सांगितले.