महापालिकेत पाणीपुरवठ्यावरून गोंधळ
By admin | Published: March 21, 2017 05:39 AM2017-03-21T05:39:16+5:302017-03-21T05:39:38+5:30
महापालिकेच्या पहिल्याच सभेत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सर्व विरोधकांनी पुढील पाच वर्षांच्या कारभाराची चुणूक दाखवली.
पुणे : महापालिकेच्या पहिल्याच सभेत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सर्व विरोधकांनी पुढील पाच वर्षांच्या कारभाराची चुणूक दाखवली. भाजपाच्याच सदस्यांनी उपस्थित केलेला पाणीपुरवठ्याचा विषय लांबणीवर नेत अखेरीस विरोधकांनी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सत्ताधाऱ्यांना मान्य करायला लावले. महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला शहराचा अभ्यास करून विस्कळीतपणा नीट करण्याचे आदेश दिले.
सभेच्या सुरुवातीलाच भाजपाच्या सदस्या वर्षा तापकीर यांनी उपनगरांमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे स्पष्ट करून, प्रशासनाने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. त्यावर हा संपूर्ण पुणे शहराचाच प्रश्न आहे, त्यावर चर्चा होऊ द्या, अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधकांबरोबरच भाजपाच्याही अनेक सदस्यांनी
पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या नंदा लोणकर यांना बोलू देण्यावरून वाद झाला.
लोणकर यांनी त्यांच्या परिसरातील प्रश्न मांडण्यास सुरुवात केली, त्यांचे बोलणे झाले असे समजून महापौरांनी भाजपाच्या अजय खेडेकर यांना बोलण्यास सांगितले; मात्र लोणकर यांनी अजून बोलायचे आहे, असे स्पष्ट केले. महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष करून, खेडेकर यांना बोलण्यास सांगितले. त्यावरून विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे संजय भोसले यांनी विरोधकांचा व त्यातही महिला सदस्यांचा आवाज बंद केला जात आहे असा आरोप केला. महापौर त्यांच्या मताशी ठाम होत्या व खेडेकर यांना बोलण्यास सांगत होत्या.
त्यावरून तुपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे व अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेसचे सर्व सदस्य महापौरांच्या समोरच्या मोकळ्या जागेत जमा झाले व त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली; मात्र सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी तुपे यांना परस्पर नंदा लोणकर यांना बोलू देऊ, असे सांगितले व मागे जाण्याची विनंती केली.
महापौरांना त्याची माहिती नव्हती, त्यामुळे त्यांनी पुन्हा खेडेकर यांनाच बोलण्यास सांगितल्यावर गदारोळ झाला. त्यानंतर लोणकर यांनाच बोलू देण्यात आले. त्यांच्यासह अजय खेडेकर, हरिदास चरवड, अविनाश साळवे, प्रव१ण चोरबेले, सुशील मेंगडे, प्रकाश कदम, उमेश गायकवाड, विशाल तांबे, धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर यांनी आपापल्या भागातील पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या.
त्याचाच संदर्भ घेत तुपे यांनी सत्तेसाठी प्रभागांची वाटेल तशी मोडतोड केल्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला, हे राज्य सरकारचे, पयार्याने भाजपाचेच पाप आहे, अशी टीका केली. आपली सत्ता आली यावर भाजपाच्या सदस्यांचा विश्वास नसल्यामुळेच ते पाणीपुरवठ्याच्या तक्रारी करत आहेत असे ते म्हणाले. तुपे यांना पाण्याच्या त्रासापेक्षाही भाजपाची सत्ता आल्याचा त्रास जास्त होत आहे असे उत्तर भिमाले यांनी दिले. अरविंद शिंदे, संजय भोसले, वसंत मोरे यांनीही पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, तो पूर्ववत करून घेण्याची जबाबदारी सत्ताधारी म्हणून भाजपावरच असल्याचे ठासून सांगितले.
दरम्यान, भाजपाच्या काही सदस्यांनी राज्य सरकारने अंदाजपत्रकात पुणे मेट्रोसाठी १३० कोटी व स्मार्ट सिटीसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुुख्यमंत्री व अर्थमंत्री यांचे अभिनंदन करून, सभा तहकूब करण्याची सूचना महापौरांकडे दिली. त्याचवेळी विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली असल्यामुळे त्यांना कर्जमाफी करावी, अशी विनंती सभेतर्फे राज्य सरकारला करण्यात यावी, अशी तहकुबीची सूचना दिली. महापौरांनी अभिनंदनाची तहकुबी सूचना स्वीकारत असल्याचे सांगून सभा तहकूब केली. विरोधकांनी त्यावरही गदारोळ केला; पण सभेचे कामकाज संपले असल्याचे महापौरांनी जाहीर केले.
(प्रतिनिधी)