मैफल सर्वार्थाने आनंदाची उधळण करेल - पं. विश्वमोहन भट्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:57 AM2018-11-05T01:57:54+5:302018-11-05T01:58:59+5:30
दिवाळीच्या निमित्ताने होत असलेली संगीताची आराधना आणि त्यामध्ये सादर होणार असलेले प्रात:समयीचे राग हा दुग्धशर्करा योगच आहे. सकाळचे राग सुमधुर असतात.
पुणे - दिवाळीच्या निमित्ताने होत असलेली संगीताची आराधना आणि त्यामध्ये सादर होणार असलेले प्रात:समयीचे राग हा दुग्धशर्करा योगच आहे. सकाळचे राग सुमधुर असतात. त्यामध्ये मृदू स्वरांचा प्रयोग होतो. रागांमधून सूर्योदयाचा नयनमनोहारी आभास होतो. बहुतांश वेळा संगीत मैफली सायंकाळी होत असल्याने रसिकांसाठी सकाळचे राग दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळेच पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होत असलेली मैफल ही सर्वार्थाने संस्मरणीय आणि आनंदाची उधळण करणारी असेल, अशा शब्दांत ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रख्यात वादक पं. विश्वमोहन भट्ट यांनी प्रात:मैफलीबाबत आनंद व्यक्त केला.
युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ फिनोलेक्स पाईप्स व पीएनजी ज्वेलर्स यांच्या सहयोगाने दिवाळी पाडव्याच्या ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेते पं. विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणेचे सुमधुर सूर रसिकांच्या दिवाळी पहाटचा आनंद द्विगुणित करणार आहेत. ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘दिवाळी पहाट’ ही कलाकार आणि रसिकांसाठी सुरेल पर्वणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘‘सकाळचे राग खूप कमी वेळा ऐकायला मिळतात. या मैफलीच्या माध्यमातून रसिकांच्या अहिरभैरवसारखे दुर्मिळ राग कानी पडतील. सध्याचा जमाना करमणुकीच्या अनेक पर्यायांचा आहे. यूट्यूबसारख्या पर्यायामुळे शास्त्रीय संगीत मैफली सहजपणे अनुभवायला मिळतात. अशा काळातही पुण्यासारख्या शहरांमध्येही संगीत मैफलींना श्रोते आवर्जून हजेरी लावतात, हे विशेष. यामुळे कलाकारांचाही गौरव होतो आणि त्यांना प्रोत्साहनही मिळते. उत्साही आणि दर्दी रसिकांमुळे मैफलींचा कळसाध्याय गाठला जातो.’’
‘‘तरुण पिढीसमोरील मनोरंजनाचे पर्याय बदलले आहेत, असे म्हटले जाते. मात्र, भारतात विविध संस्था शास्त्रीय संगीताबाबत तरुणाईमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत. सध्याची पिढी अतिशय हुशार आणि संगीतावर मनापासून प्रेम करणारी आहे. शास्त्रीय संगीत हे भारतीय परंपरेचे मूळ आहे. त्यामुळे हे मूळ तरुणाई कधीच विसरणार नाही. तरुणाईमधून श्रोत्यांप्रमाणेच उमदे कलाकारही तयार होत आहेत. प्रत्येक कलाकारासाठी रियाझ अत्यंत महत्त्वाचा असतो. रियाझातून सादरीकरणामध्ये शुद्धता येते, गळा तयार होतो, लय आणि सुरांवरील पकड पक्की होते. कलाकार मैफलीत आत्ममग्न झाला, की रसिकांपर्यंतही हा आनंद पोहोचतो,’’ असेही भट्ट म्हणाले.
सहयोगी प्रायोजक काका हलवाई स्वीट सेंटर, लोकमान्य मल्टिपर्पज को-आॅप. सोसायटी, खत्री बंधू पॉट आईस्क्रिम व मस्तानी, लक्ष्मीनारायण चिवडा, राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज हे आहेत. बेव्हरेज पार्टनर ऊर्जा, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी, हॉस्पिटॅलिटी पार्टनर जेडब्ल्यू मॅरिएट
हे आहेत.
कार्यक्रम स्थळ :
महालक्ष्मी लॉन्स
राजाराम पुलाजवळ, एरंडवणे, पुणे
/>दिनांक : गुरुवार, ८ नोव्हेंबर
वेळ : पहाटे ५.३० वाजता
प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेशिका आवश्यक