चौपदरीकरणाला मुहूर्त
By admin | Published: November 11, 2015 01:27 AM2015-11-11T01:27:47+5:302015-11-11T01:27:47+5:30
मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल बांधण्याच्या निविदाविषयक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे
देवराम भेगडे, देहूरोड
मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल बांधण्याच्या निविदाविषयक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आगामी दोन वर्षांत काम पूर्ण करण्याची मुदत प्रस्तावित आहे. चौपदरीकरणासाठी ५०.२६ कोटी व उड्डाणपुलासाठी १०२. ८५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
गेल्या ११ वर्षांपासून रखडलेल्या निगडी ते देहूरोड ( किमी २०.४०० ते किमी २६.७००) दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपूल बांधकाम करण्याच्या निविदा प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून मंगळवारी सुरुवात करण्यात आली. महामंडळाच्या वतीने चौपदरीकरण व उड्डाणपूल कामासाठी एका सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील ई निविदा सूचना बुधवारी रस्ते विकास महामंडळाच्या, तसेच राज्य शासनाच्या ‘महाटेंडर’ या संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार येत्या महिन्यात सल्लागार संस्थेची नेमणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या वतीने निगडी ते देहूरोड दरम्यानच्या सव्वा सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरण कामासाठी ५०.२६ कोटी रुपये खर्चाचे व देहूरोड येथील शस्त्रास्त्र कारखाना ( आयुध निर्माणी) ते कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामास १०२.८५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. लवकरच संबंधित कामाच्या निविदा प्रसिद्ध होणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, ‘‘मुंबई -पुणे महामार्गावरील निगडी ते देहूरोड रस्त्याच्या चौपदरीकरण व उड्डाणपूल कामासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही कामांचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. दिवाळी झाल्यानंतर निविदा प्रसिद्ध होणार आहे.
११ वर्षांत अपघातात २०० बळी
निगडी ते देहूरोड रस्त्यावर गेल्या ११ वर्षांत अपघातात २००हून अधिक बळी गेले आहेत. अपघातात २५०हून अधिक जखमी व कायमचे जायबंदी झाले आहेत. या रस्त्याचे चौपदरीकरण, तसेच देहूरोड येथे भुयारी मार्ग अगर उड्डाणपूल बांधण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीची कॉँग्रेसह राज्यात सत्ता असतानाही राष्ट्रवादीचे तत्कालीन देहूरोड शहराध्यक्ष मिकी कोचर यांच्या नेतृत्वाखाली व फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी सर्वाधिक आंदोलने केली आहेत.
भाजपाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी आंदोलन केले होते. देहूरोड, चिंचोली, किवळे - विकासनगर परिसरातील विविध पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनीही रस्ते विकास महामंडळाकडे व राज्य मंत्रिमंडळातील संबंधित मंत्र्यांना अनेकदा निवेदने दिली होती. रस्ता रोको व उपोषणासारखी आंदोलने करण्यात आली होती. मात्र, वारंवार आश्वासनांपलीकडे काहीही हाती लागले नव्हते.
रखडलेल्या मार्गावर टोलवसुली
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सन २००४ मध्ये हस्तांतर झाले होते. महामंडळाकडे ताबा आल्यानंतर ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ या योजनेनुसार निगडी ते शिळ फाटा (ठाणे) दरम्यानचे रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे निश्चित झाल्यानंतर हा रस्ता चौपदरीकरणासाठी म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर या टोल कंपनीस ९ आॅगस्ट २००४मध्ये देण्यात आला होता.
सरकारने दोन वर्षांत काम पूर्ण करून टोल आकारणी करण्यास मान्यता दिली होती. म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने देहूरोड सेन्ट्रल चौक ते शिळ फाटादरम्यानचे रुंदीकरणाचे काम करून सप्टेंबर २००६पासून सोमाटणे फाटा व लोणावळा येथे
टोल आकारणी सुरू केली आहे. मात्र, निगडी ते देहूरोड या सव्वासहा किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या ११ वर्षांत अपूर्ण असताना टोल वसुली करण्यात येत असल्याने संबंधित वाहनचालक वारंवार नाराजी व्यक्त करीत आहेत.