तब्बल १३ वर्षांनी लागला मुहूर्त; पुण्यातील साथराेग रुग्णालयाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:52 PM2022-12-23T13:52:13+5:302022-12-23T14:02:31+5:30
औंध जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात १०० खाटांचे साथरोग रुग्णालय आकाराला येत आहे
पुणे : स्वाईन फ्लू असाे की कोरोना. पुणे हे या साथराेगासाठी हाॅटस्पाॅट ठरले. अगदी देशात सर्वाधिक साथराेग रुग्ण असणारे शहर म्हणून पुण्याची नाेंद झाली. काेराेना काळात तर बाधितांना वेळेत बेड न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. म्हणून पुण्यात स्वतंत्र साथरोग रुग्णालय करण्यास स्वाईन फ्लूच्या साथीपासून सुरुवात झाली असली तरी हे रुग्ण साकारण्याला प्रत्यक्षात १३ वर्ष उलटले आहेत.
औंध जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात १०० खाटांचे साथरोग रुग्णालय आकाराला येत आहे. डिसेंबरअखेर रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन हाेण्याची शक्यता आहे.
शहरात सध्या संसर्गजन्य आजारांच्या उपचारांसाठी महापालिकेचे नायडू हे एकमेव रुग्णालय आहे. ससून रुग्णालय आणि औंध जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करण्यात आले. मात्र, अपुऱ्या बेडच्या संख्येमुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील त्रुटी प्रकर्षाने समोर आल्या. या पार्श्वभूमीवर शहरात स्वतंत्र साथरोग रुग्णालय असावे, यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या.
अर्थसंकल्पातही तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. ती आता तब्बल १३ वर्षांनंतर प्रत्यक्षात येत आहे. यासाठी औंध येथे आरोग्य विभागाची ८० एकर जागा असून, जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात साथरोग रुग्णालय आकाराला येत आहे. भविष्यात संसर्गजन्य आजाराची साथ आल्यास या रुग्णालयाचा उपयाेग हाेणार आहे.
सन २००९ला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुण्यात स्वतंत्र साथरोग रुग्णालय उभारण्याविषयी सूतोवाच केले होते.
''नव्या साथरोग रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरअखेर हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. साडेसात काेटींचे बजेट असलेल्या या रुग्णालयाचा वापर भविष्यात संसर्गजन्य आजारांचे संकट परतवून लावण्यासाठी हाेईल. रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. - डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय''