झाडुवाल्यामार्फत १० हजारांची लाच घेणाऱ्या मुकादमावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 08:30 PM2021-10-03T20:30:00+5:302021-10-03T21:12:57+5:30
नाईट ड्युटी चालू ठेवण्यासाठी झाडुवाल्यामार्फत १० हजार रुपयांची लाच घेत होता
पुणे : कचरा मोटार विभागातील नाईट ड्युटी चालू ठेवण्यासाठी झाडुवाल्यामार्फत १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुकादमावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तर कचरा गाडीवरील झाडुवाला याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
मुकादम रवी लोंढे (विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय) आणि कचरा गाडीवरील झाडुवाला हर्षल ज्ञानेश्वर अडागळे (वय ३१) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कचरा मोटार बिगारी पदावरील एका ३६ वर्षाच्या कामगाराने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे कचरा मोटार बिगारी पदावर काम करत आहेत. त्यांची नाईट ड्युटी चालू ठेवण्यासाठी तसेच किटक विभागात बदली न करण्यासाठी मुकादम रवी लोंढे याने १५ हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी १ ऑक्टोंबर रोजी करण्यात आली. चर्चेअंती १० हजार रुपये लाच हर्षल अडागळे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये स्वीकारताना हर्षल अडागळे याला रविवारी पकडण्यात आले. खडक पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हर्षल अडागळे याला अटक केली आहे. विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी अडागळे याला ५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.