राज्यातील म्युकरमायकोसिसचे बारामतीत पाहिले शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:10 AM2021-05-21T04:10:21+5:302021-05-21T04:10:21+5:30
बारामती: म्युकरमायकोसिस या आजाराचा फैलाव व त्याबाबत नागरिकांमध्ये असणारी भीती व अज्ञान याबाबींचा विचार करून बारामतीमध्ये म्युकरमायकोसिसचे तपासणी शिबिर ...
बारामती: म्युकरमायकोसिस या आजाराचा फैलाव व त्याबाबत नागरिकांमध्ये असणारी भीती व अज्ञान याबाबींचा विचार करून बारामतीमध्ये म्युकरमायकोसिसचे तपासणी शिबिर घेण्यात आले. येथील नटराज नाट्य कला मंडळ व इंडियन डेंटल असोसिएशन बारामती - फलटण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी नटराज नाट्य कला मंदिर येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची विनामूल्य तपासणी करण्यात आली. शिबिरात ४१० रुग्णांनी तपासणी करून घेतली. यामधून म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे असलेले १६ रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर पुढील उपचार करण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात बारामती व फलटण येथील १८ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. यामध्ये डॉ. विश्वराज निकम, डॉ. आशुतोष आटोळे, डॉ. विक्रम फरांदे, डॉ. प्रीतम ललगुणकर, डॉ. प्रदीप व्होरा, डॉ. मंदार पाटील, डॉ. मोहनचंद पाटील, डॉ. राधिका कुलकर्णी, डॉ. तोशीता गोरे, डॉ. नंदिनी हाके, डॉ. प्रशांत हगारे. डॉ. सचिन कोकणे, डॉ. राजेंद्र ढाकाळकर, डॉ. सुहासिनी सोनवले, डॉ. हर्षल राठी, डॉ. वैशाली कोकरे, डॉ. नेत्रा सिकची, डॉ. रेवती संत, डॉ. चेतन गुंडेचा, डॉ. अमर अभंग यांनी सक्रिय सहभाग घेतला.
तपासणीमध्ये म्युकरमायकोसिसने बाधित आढळून आलेल्या रुग्णांना बारामतीमध्येच उपचार व्हावेत, याकरिता स्वतंत्र रुग्णालय तयार करणेचा प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात येणार आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित सदर हॉस्पिटल सुरू करण्याची कार्यवाहि केली जाणार असल्याचे संयोजक ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यापुढे दर बुधवारी सायं. ५ ते ६ या वेळेमध्ये नटराज मंदिर येथे मोफत तपासणी व सल्ला केंद्र सुरू राहणार असल्याचे गुजर म्हणाले.
शिबिरास उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी भेट दिली.
बारामतीत म्युकरमायकोसिसचे तपासणी शिबिर नटराज नाट्य कला मंदिर येथे पार पडले.
२००५२०२१ बारामती—०९