धक्कादायक! मुकबधीर १० वर्षाच्या मुलीला पळवून नेऊन दारु पाजून केला विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 03:04 PM2022-05-23T15:04:11+5:302022-05-23T15:06:58+5:30
हा प्रकार हडपसरमधील काळेपडळ येथील गणेश कॉलनीत घडला...
पुणे : घराजवळ खेळत असलेल्या अल्पवयीन मुकबधीर असलेल्या १० वर्षाच्या मुलीला दोघांनी पळवून नेऊन तिला जबरदस्तीने दारु पाजली व तिचे कपडे काढून तिचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राठोड आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील काळेपडळ येथील गणेश कॉलनीत शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १० वर्षाची मुलगी मुकबधीर आहे. ती घराजवळ असलेल्या कॉलनीत खेळत होती. यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी तिला कशाचे तरी आमिष दाखवून मोटारसायकलवरुन जबरदस्तीने पळवून कंजारभाट वस्तीमध्ये नेले. तेथे तिला जबरदस्तीने दारु पाजली. राठोड नावाच्या नराधमाने तिचे कपडे काढून तिच्याबरोबर अश्लील वर्तन केले. दुसर्याने तिचे केस ओढून तिची लैंगिक छळवणूक केली.
मुलगी बेपत्ता झाल्याचे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लक्षात आल्यावर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. तेव्हा रात्री साडेअकरा वाजता ती मिळून आली. तिने घडलेल्या बाबींची माहिती दिल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक साठे अधिक तपास करीत आहेत.