मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपते; चित्रा वाघ यांचा आघाडीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 03:11 PM2024-11-12T15:11:33+5:302024-11-12T15:11:48+5:30

महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून महायुती सरकारने केले

Mukhyamantri Majhi Ladaki Baheen Yojana pokes opponents in the eye Chitra Wagh's top target | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपते; चित्रा वाघ यांचा आघाडीवर निशाणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपते; चित्रा वाघ यांचा आघाडीवर निशाणा

पिंपरी : महाविकास आघाडीचे धोरण महिलांविरोधी आहे, तर महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून महायुती सरकारने केले आहे. नारीवंदन विधेयक, मुख्यमंत्री लाडकी बहीण यांसारख्या योजनांच्या माध्यमातून नारी वंदनीय असल्याचा विश्वास देणाऱ्या भाजप सरकारला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी सांगितले. महायुतीचे भोसरीतील उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ इंद्रायणीनगर येथे महिला निर्धार मेळावा झाला. यावेळी वाघ बोलत होत्या.

भोसरी मतदारसंघातील आमदार महेश लांडगे याच तत्त्वावर काम करत असून स्त्री शक्तीच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या, महिलांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या लांडगे यांच्या हॅटट्रिकसाठी महिलांनी पुढे यावे, असे आवाहनही वाघ यांनी केले.

चित्र वाघ म्हणाल्या की, महायुतीने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक सक्षम केले असून छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे. ही योजना अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या. महेश लांडगे यांचे काम मी अगदी जवळून पाहिले आहे. त्यांनी नारीशक्तीला बळकटी देण्याचे काम केले आहे. इंद्रायणी थडीसारखा उपक्रम दरवर्षी ते राबवतात. या माध्यमातून लाखो महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

महेश लांडगे यांची ‘हॅटट्रिक’ करायची

भोसरीतील सुरक्षेच्या मुद्द्यावर महिला महेश लांडगे यांना मतदान करतील यात शंका नाही. कारण ज्या ज्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला, त्यावेळी महेश लांडगे त्या ठिकाणी उभे ठाकलेले मी पाहिले आहेत. त्यांची हॅटट्रिक महिला शक्तीच्या माध्यमातून फिक्स करायची आहे, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले.

Web Title: Mukhyamantri Majhi Ladaki Baheen Yojana pokes opponents in the eye Chitra Wagh's top target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.