Kasba By Election: मतदान करताना मुक्ता टिळक बरोबर नसल्याने त्यांची आठवण येते; शैलेश टिळकांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 01:54 PM2023-02-26T13:54:16+5:302023-02-26T13:54:44+5:30
पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हाच भाजपचा विजय निश्चित होता.
पुणे: विधानसभेच्या कसबा व चिंचवड या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात, तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याच्या कारणावरून नाराजीची चर्चा सुरु होती. पण कुटुंबीयांनी आम्ही नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते. व त्यानंतर ते प्रचारात सहभागी झाले होते. आजही टिळक कुटुंबीयांनी आनंदाने मतदान केले आहे. पण यावेळी मतदान करताना मुक्ता टिळक बरोबर नसल्याने त्यांची आठवण येत असल्याचे शैलेश टिळक यांनी सांगितले आहे.
आज शैलेश टिळक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले. त्यानंतर लोकमतशी संवाद साधला. शैलेश टिळक म्हणाले, आज मुक्ता टिळक आमच्याबरोबर नाहीत. त्याच दुःख होतंय. प्रत्येक निवडणुकीला आम्ही एकत्र येतो. त्यामुळे त्यांची आठवण येणे स्वाभाविकच आहे. आताचे वातावरण खूप चांगले आहे. पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हाच भाजपचा विजय निश्चित होता. आम्हाला खात्री आहे की, रासने प्रचंड बहुमताने विजयी होतील.
आम्ही स्वतः दारोदारी या प्रचारात फिरलो
भाजपचा कुठलाही नेता, कार्यकर्ता देशासाठी ड्युटी म्हणून ग्राउंड लेव्हलवर येऊन काम करतो. कुठलीही निवडणूक भाजप हलख्यात घेत नाही. आमच्या पक्षाचे नियोजन हे उत्तम असते. मागच्या ८ वर्षात भाजपमुळे परिवर्तन झाले आहे. आमची नाराजी कधीच दूर झाली होती. ब्राह्मण समाजाने आणि पक्षातील सर्वांनी रासने यांना पाठिंबा दिला. आम्ही स्वतः दारोदारी या प्रचारात फिरलो असल्याचे कुणाल टिळक यांनी सांगितले आहे.
निकालाची राज्यालाही उत्सुकता
२ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसब्यातील मतमोजणी कोरेगाव मार्क येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव इथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता आहे.