मुक्ताईने ज्ञानोबा माऊलींसाठी धाडिला रक्षेचा धागा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:50 AM2017-08-08T02:50:17+5:302017-08-08T02:50:17+5:30
जळगाव व पंढरपूर येथील संत मुक्ताई संस्थानच्या माध्यमातून नारळी पौर्णिमा अर्थात ‘रक्षाबंधन’ सणाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई संस्थानाकडून यंदा प्रथमच बंधू संत ज्ञानदेवांसाठी राखी अर्पण करण्यात आली.
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय आणि त्यांची बहीण लाडकी मुक्ताई यांच्यातील प्रेम पुन्हा एकदा नव्याने जगासमोर जागवण्याचा एका विधायक उपक्रम नुकताच आळंदीत राबवला गेला. जळगाव व पंढरपूर येथील संत मुक्ताई संस्थानच्या माध्यमातून नारळी पौर्णिमा अर्थात ‘रक्षाबंधन’ सणाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई संस्थानाकडून यंदा प्रथमच बंधू संत ज्ञानदेवांसाठी राखी अर्पण करण्यात आली.
रक्षाबंधन हा भावबहिणीतील नाते अधिक दृढ करण्याचा सण.
हिंदू संस्कृतीत या सणाला एक
वेगळे महत्त्व आहे. निवृत्तीमहाराज, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई या चार बंधुचे नातेही असेच
आदर्शवत होते. संत साहित्यामध्ये तर चारही भावांची ही नावे नुसती नावे नसून ते जीवनोद्धाराचे व मोक्षाचे मार्ग मानले जातात.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांच्यातील नाते हे अतिशय सुंदर असेच होते. मुक्ताईचे संत ज्ञानेश्वरांशी असणारे बहिण भावाचे नाते आजच्या जगातही अत्यंत प्रेरक आणि आदर्शवत आहे. तोच संस्कार जपण्याच्या दृष्टिकोनातून हा अभिनव असा उपक्रम आळंदीमध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम आज राबविण्यात आला. मुक्ताई संस्थानच्या पुढाकाराने तो पूर्णत्वास गेला.
मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांचे चिरंजीव संदीप
पाटील यांना हा उपक्रम सुचला.
संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थानचे
प्रमुख विश्वस्त अभय टिळक
यांनी हा ‘पवित्र धागा’ माऊलींच्या संजीवन समाधीवर ठेवून जयजयकार केला.
संत मुक्ताई संस्थानकडून यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमामार्फत त्रंबकेश्वर येथील निवृत्तीनाथमहाराज, आळंदीतील ज्ञानेश्वरमहाराज, सासवड येथील सोपानकाका यांनाही राखी पाठविण्यात आली आहे.
चालू वर्षीपासून मुक्ताई संस्थानने सुरूकेलेला हा उपक्रम खरोखर गोड आहे. आम्ही या उपक्रमाचे कौतुक करतो. रक्षाबंधनाच्या दिवशी मुक्ताईचा हा पवित्र धागा साºया विश्वाला बंधुप्रेमाचा धडा देईल.
- अभय टिळक, प्रमुख विश्वस्त आळंदी
मुक्ताई संस्थानाकडून तिन्ही भावंडांना राखी जावी असा माझा मानस होता. त्यामुळे तो तत्काळ अमलात आणण्यासाठी प्रथम संत माऊलींना राखी अर्पण करण्यात आली.
- संदीप पाटील