मुठेचा पूर अतिक्रमणामुळेच! अरुंद होणाऱ्या नदीपात्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:41 PM2024-11-28T12:41:59+5:302024-11-28T12:42:25+5:30
खडकवासला धरणातून केवळ ३५ हजार क्युसेक पाणी सोडल्याने पुण्यातील नदीकाठच्या भागांमध्ये अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले होते
पुणे : शहरातील मुठा नदीत आणि नाल्यांमध्ये होणारे अतिक्रमण, अवैध बांधकामे आणि टाकला जाणारा राडारोडा यामुळे खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेकने पाणी सोडल्याबराेबर पुण्यात नदीला पूर येत आहे. नदीपात्रात व नदी तीरावरील कचऱ्यामुळे नदीच्या वहन क्षमतेत घट झाली आहे. त्यानेच पुराचा धोका वाढलेला आहे, असे महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालात नमूद केलेले आहे. तसेच नदीतील अतिक्रमण आणि अरुंद होणाऱ्या पात्राकडे पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचा ठपकादेखील या समितीने ठेवला आहे.
खडकवासला धरणातून केवळ ३५ हजार क्युसेकने पाणी सोडल्यामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या भागांमध्ये अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. नाले, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. पावसाच्या या हाहाकाराने पुण्यातील नदीकाठच्या सिंहगड रस्ता परिसरातील विठ्ठलनगर, एकतानगरी, निंबजनगर, पाटील इस्टेट, शांतीनगर यासह येरवडा, पुलाची वाडी आदी भागांत कंबरे इतके पाणी होते. या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. नदीकाठ लगतच्या परिसरात आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू होती. तब्बल ५ हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले होते.
...म्हणून वाढला पुराचा धाेका
शहरात पूर कशामुळे आला यांचा अभ्यास करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिकेचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांची समिती नेमली होती. त्याचा अहवाल सप्टेंबर महिन्यात सादर करण्यात आला. पण आयुक्तांनी हा अहवाल सार्वजनिक न केल्याने सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आक्षेप घेतला होता. आचारसंहिता संपल्यानंतर हा अहवाल जाहीर केला आहे. मुठा नदीत झालेली अवैध बांधकामे, टाकला जाणारा राडारोडा यामुळे खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेकने पाणी सोडल्यानंतर पूर येत आहे. नदीपात्रात व नदी तीरावर कचरा टाकला जात आहे. विविध अडथळ्यांमुळे नदीच्या वहन क्षमतेत घट झाली आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने पुराचा धोका वाढलेला आहे.
नदीचा प्रवाह अडथळा मुक्त करावा
पूर कशामुळे आला याचा अभ्यास करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या समितीने पूर येऊ नये यासाठीच्या विविध उपाय योजनादेखील अहवालात सुचविल्या आहेत. त्यामध्ये नदीच्या वाहन क्षमतेमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे नदीत घनकचरा, राडारोडा येणार नाही यांची काळजी घ्यावी. शहरीकरणामुळे नैसर्गिक नाल्याची रुंदी कमी झाली आहे. नैसर्गिक नाले बुजविल्याने सखल भागात पाणी साठवून राहते आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी जास्त वेळ लागतो. निळ्या पूर रेषेच्या आत बांधकामे आहेत. त्या बांधकामांवर निळी पूर रेषा, लाल पूर रेषा दर्शविण्यात यावी. ज्या ठिकाणी नदीचे अस्तित्व राहिले नाही, तेथे बांधकामे पाडून नदी अस्तित्वात आणावी. प्रवाहाला अडथळे ठरणारे बंधारे, पूल काढून टाकावेत-अतिक्रमण, अवैध बांधकाम करणारे, राडारोडा, कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. निळ्या पूर रेषेप्रमाणे नदीचा प्रवाह अडथळामुक्त असावा, अशी उपाय योजना सुचवली आहे.
मुठेची वहनक्षमता असावी १ लाख क्युसेक
मुठा नदीतून १ लाख क्युसेक पाणी वाहून जाण्याची क्षमता असावी. नाल्यांची रुंदी कमी होणे, कचरा अडकणे, बांधकामे होणे यामुळे नाल्यांमध्ये पाणी तुंबून परिसरातील वस्तीत पाणी साठते. नाल्यातील हे अडथळे काढून टाकावेत. पूर रेषेसोबतच २० हजार क्युसेक, ३०, ४० क्युसेक पाणी कुठल्या भागात येते हे चिन्हांकित करावे, त्याचे नकाशे तयार करावेत. नदीपात्रातील अतिक्रमणे काढून टाकावीत, राडारोडा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, नाल्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, पूर रेषेच्या आतील अवैध बांधकामे पाडून टाकावीत, अशी शिफारस या समितीने केली आहे.
दोन महिने होऊनही बैठक नाही
पूरस्थितीच्या कारणाबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर होऊन दोन महिने झाले आहेत. त्यावर अद्याप बैठक घेतली नाही. आता आयुक्तांकडून बैठक घेऊन कारवाईचे आदेश दिले जाणार आहेत.
मुठा नदीला आलेल्या पुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल जाहीर केला आहे. नदीची पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य कारवाई केली जाईल, उपाययोजना केल्या जातील. - डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका