मुळा, मुठा, पवना नद्यांचे जल
By admin | Published: December 22, 2016 02:39 AM2016-12-22T02:39:53+5:302016-12-22T02:39:53+5:30
मुंबईत राजभवनाजवळील समुद्रात जागतिक दर्जाचे श्री छत्रपती शिवाजीमहाराजारांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यानुसार
पिंपरी : मुंबईत राजभवनाजवळील समुद्रात जागतिक दर्जाचे श्री छत्रपती शिवाजीमहाराजारांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यानुसार शनिवारी (दि. २४) शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक़्रम होत असून, या कार्यक्रमासाठी इंद्रायणी, पवना, मुळा व मुठा या नद्यांचे जल नेण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामधून पवित्र इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा या नद्या वाहतात. या नद्यांचे जल आणि मृदा (माती) गुरुवारी, २२ डिसेंबरला सकाळी १० वाजता कलशामध्ये जमा केले जाईल. शहरातील विविध ठिकाणच्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यांजवळ कार्यकर्ते एकत्रित येऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे.
शुक्रवारी पहाटे मंडलाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जलकलश रथ मुंबईकडे रवाना होईल. रथाबरोबर शहरातील शेकडो भाजपा कार्यकर्ते व नागरिक मुंबईत सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. देशभरातून आलेल्या या मंगलकलशांची मिरवणूक काढून सायंकाळी ५.३० वाजता गेट वे आॅफ इंडिया येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगलकलश सुपूर्द केला जाणार आहे.
मुंबईतील या सोहळ्याचे प्रक्षेपण शहरातील नागरिकांना पाहता यावे, याकरिता दुपारी एकला प्रमुख चौकांमध्ये एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, प्रदेश सचिव उमा खापरे, प्रदेश सदस्य एकनाथ पवार, सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी, सरचिटणीस प्रमोद निसळ, सारंग कामतेकर, अमोल थोरात, बाबू नायर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)