पुणे शहरातील रखडलेल्या ‘जायका’ प्रकल्पाला गती देणार : प्रकाश जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 08:29 PM2020-02-14T20:29:08+5:302020-02-14T20:32:22+5:30
मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरण प्रकल्पाला प्रचंड विलंब
पुणे : शहरातील मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरण प्रकल्पाला प्रचंड विलंब झाला आहे. केंद्रांच्या पर्यावरण मंत्रालयाचा पदभार पुन्हा आपल्याकडे आल्याने आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यासाठी लवकरच केंद्र आणि राज्य शासनाच्या स्तरावर बैठक लावण्यात येईल, असे स्पष्टीकरण केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे केले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण सभा (दिशा) समितीची बैठक शुक्रवार (दि.१४) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परीषदेत जावडेकर यांनी जायका प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. देश, राज्यातील बहुतेक सर्वच नद्या प्रदूषित झाल्या आहेत. वाढत्या शहरीकरणात ७० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात मैलापाणी थेट नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यावर उपाय करण्यासाठी व नद्यांच्या शुध्दीकरणासाठी केंद्र शासन लवकरच एक गंभीर पाऊल उचलणार असल्याचे सूतोवाच जावडेकर यांनी केले.
दरम्यान, मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धिकरणासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या (जायका) सहकार्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्प मंजूर होऊन चार-पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप प्रकल्पाचे काम सुरु झाले नसल्याचे निदर्शनास आणल्यावर या प्रकल्पाला देखील आता गती देणार असल्याचे स्पष्ट केले.
------------------------
‘मेट्रो’च्या दोन मार्ग मार्च २०२० अखेर पर्यंत सुरु करणार
पुणे मेट्रोचे काम जोमाने सुरु आहे.यामध्ये वनाज ते कर्वेरोड आणि संत तुकाराम नगर ते बोपोडी या दोन्ही मार्गावर पहिल्या टप्प्यात १२ किलो मिटरचे काम पूर्ण होत आले असून, येत्या मार्च २०२० अखेर पर्यंत मेट्रो प्रत्यक्षात सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान सध्या काम सुरु असलेल्या तिन्ही मेट्रो मार्ग २०२२ अखेर पर्यंत सुरु होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तर शहरामध्ये अन्य भागांमध्ये देखील मेट्रो सुरु करण्याची मागणी येत असून, मागणीनुसार मार्गांचे मास्टर प्लॅन तयार करण्यात येतील.