मुळा-मुठा नदीकाठच्या कामांना लवकरच सुरुवात, आयुक्त कुणाल कुमार यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:50 AM2018-03-06T03:50:53+5:302018-03-06T03:50:53+5:30
पुणे शहरातून वाहणा-या मुळा-मुठा नदीकाठ सुधार व विकसन योजनेला एप्रिल अखेरपर्यंत केंद्रीय पर्यावरण विभाग व पाटबंधारे विभागाची मान्यता मिळेल. या प्रकल्पामुळे नदीचा मुख्य प्रवाह आणि पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नसल्याचे सांगत येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल...
पुणे - शहरातून वाहणा-या मुळा-मुठा नदीकाठ सुधार व विकसन योजनेला एप्रिल अखेरपर्यंत केंद्रीय पर्यावरण विभाग व पाटबंधारे विभागाची मान्यता मिळेल. या प्रकल्पामुळे नदीचा मुख्य प्रवाह आणि पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नसल्याचे सांगत येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून सुमारे ८८ किलो मीटर मुळा-मुठा नदी वाहते. परंतु गेल्या काही वर्षांत वाढते प्रदूषण व शहरीकरणामुळे नद्यांचे नाल्यात रूपांतर झाले आहे. या दोन्ही नद्यांना पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी नदीकाठ सुधार व विकसन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याबाबत सोमवारी या प्रकल्पाच्या कामांची आखणी, होणारे बदल, आवश्यक असलेल्या परवानग्या, काम पूर्ण करण्याचा कालावधी, अपेक्षित खर्च, निधी कसा उपलब्ध होणार, महापालिकेत सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. आयुक्तांनी सांगितले, की मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेसाठी तब्बल २ हजार ६१९ कोटी रुपये खर्च येणार आहे. यामध्ये महापालिका, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, पर्यावरण विभाग अशा अनेक विभागांना एकत्र घेऊन काम करावे लागणार असल्याने यावर नियंत्रण ठेवणे व समन्वयासाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. तसेच योजनेच्या सविस्तर आराखड्याचा मसुदा तयार केला असून, अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय पर्यावरण विभाग व पाटबंधारे खात्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या दोन्ही विभागांकडून लवकरच मान्यात मिळेल. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल.
गुजरातमधील साबरमती नदीवर साकारण्यात आलेल्या नदीकाठ सुधार प्रकल्प आणि पुण्यातील प्रकल्पामध्ये मोठा फरक आहे. पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प हरित प्रकल्प असून, येथे ८७ टक्के हिरवळ असून, उर्वरित जागी खेळाची मैदाने, चालण्यासाठी ट्रक, सायकल ट्रॅक यांसारखा सुविध करण्यात येणार आहेत. तसेच साबरमती हा केवळ ११ किमीचा प्रकल्प असून, तब्बल १२०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तर पुण्यात ४४ किमीचा नदीकाठ विकसित करण्यात येणार असून, २६०० कोटी खर्च होणार असल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले.
पुढील शंभर वर्षांचा
विचार करून नियोजन
पुणेकरांना पुन्हा नदीसोबत जोडण्यासाठी, दोन्ही नद्यांची पूरवहन क्षमता वाढविणे, प्रदूषणमुक्त नदी करण्यासाठी पुढील शंभर वर्षांचे नियोजन करून हा मुळा-मुठा नदीकाठ सुधार व विकसन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांमध्ये मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे, गावांमधून येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, नदीघाट, पुरापासून सुरक्षा आणि नदीची स्वच्छता हा प्रकल्पामागचा मुख्य उद्देश आहे.