मुळशीचा अभिमान, स्वाभिमान पुणेकरांनी दिल्लीला पाठवला; प्रवीण तरडे अन् मित्रांच्या भावना
By श्रीकिशन काळे | Published: June 4, 2024 06:22 PM2024-06-04T18:22:46+5:302024-06-04T18:23:05+5:30
मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने एक अत्यंत सुशिक्षित, सालस आणि शांत स्वभावाचा, त्याच्या बोलण्यात कुठेही आगपाखड नसणारा खासदार
पुणे : ‘‘माझा मित्र, माझा जिवाभावाचा भाऊ आज खासदार झाला आहे. त्यामुळे खूप आनंदाचा क्षण आहे. मुळशीचा अभिमान, स्वाभिमान पुणेकरांनी दिल्लीला पाठवला आहे. निसर्ग देखील आनंदी झाला असून, आकाशातून आनंदाश्रू येत आहेत. हे खरंतर गिरीश बापट यांचेच आनंदाश्रू आहेत, आज त्यांची देखील आठवण येत आहे,’’ अशा भावना भाजपचे विजयी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे खास मित्र व अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केल्या.
लोकसभा निवडणूकीमध्ये पुणे लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे निवडून आले. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी आनंदोत्सव साजरा केला. त्याविषयी प्रवीण तरडे म्हणाले, ‘‘आमचा मैत्रीचा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आमचे काही मित्र लेखक होते, दिग्दर्शक होते. काही जण इव्हेंटमध्ये आहेत. या मैत्रीच्या पॅटर्नमध्ये खासदार कमी होता. तो पुणेकरांनी खासदार बनवला आणि दिल्लीला पाठवला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने एक अत्यंत सुशिक्षित, सालस आणि शांत स्वभावाचा, त्याच्या बोलण्यात कुठेही आगपाखड नसते. प्रत्येक गोष्टीचा शांत विचार करून रिॲक्ट होतो. लगेच रिॲक्ट होणे त्याची वृत्ती नाही. त्यामुळे पुण्याच्या संस्कृतीला साजेसा असा हा उमेदवार आहे. पुण्याच्या इतिहासाला, परंपरेला साजेसा असा खासदार दिल्लीत पाठवत आहोत. तो माझा भाऊ आहे. माझी आई, त्याची आई बहिणी आहेत. एका गावात राहतो, शेजारी जन्म झाला. आमच्या दोघांच्या जन्मात बारा तासाचे अंतर आहे. एकाच दिवशी जन्मलो आणि सेम वय आहे. मुळशी तालुक्याचा अभिमान, मुळशी तालुक्याचा स्वाभीमान दिल्लीला पाठवला आहे. पुणेकरांनी मुळशी तालुक्यातील रांगडेपणा, सच्चेपणा दिल्लीला पाठवला आहे.
मी केलेले भाषण भावासाठी, मित्रासाठी होते. मी कधीच भाषण केले नव्हते. त्याला पुणेकरांनी मुरलीधर मोहोळ लाखाच्या मताधिक्याने दिल्लीला जातोय. निसर्ग देखील आनंदी झाला आहे आणि पावसाच्या रूपात आनंदाश्रू येत आहेत. गिरीश बापट साहेबांची आठवण आज येत आहे. त्यांचेच हे आनंदाश्रू आहेत.’’ रमेश परदेशी (पिट्या भाई) म्हणाले,‘‘खूपच भारी वाटतंय. आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे. मी प्रचारात चोवीस तास होतो. पूर्णवेळ प्रचार करत होतो. सर्वसामान्य कुटुंबातील मित्र आज पुण्याचा खासदार झाला आहे. जे पुणेकरांना अपेक्षित तेच काम तो करणार आहे.’’