मुळशीच्या युवकाने केले अमा दब्लाम शिखर सर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 01:35 AM2018-11-16T01:35:29+5:302018-11-16T01:36:18+5:30
एव्हरेस्टवीर भगवान चवले : नेपाळमधील खुंबू व्हॅलीतील २२५०० फूट उंचीवरील शिखर
भूगाव : मुळशीचा युवक एव्हरेस्टवीर भगवान चवले यांनी नेपाळमधील खुंबू व्हॅलीमधील चढाईस अत्यंत अवघड असणारे २२५०० फुटाचे अमा दब्लाम शिखर सर करुन भारताचे नाव उंचावर नेले आहे. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. नेपाळमधील खुंबू व्हॅलीमधील चढाईस अत्यंत अवघड असणारे २२५०० फुटाचे अमा दब्लाम शिखर एक आव्हानच मानले जाते. जगभरातून दिग्गज गिर्यारोहक या शिखरावर चढाई करण्यास येतात.
तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि शारीरिक दृष्ट्या कणखर असणारेच या शिखरावर चढाईस योग्य ठरतात. भगवान चवले यांनी याच वर्षी मे महिन्यात एव्हरेस्ट सर केले आहे. या दरम्यान हे शिखर कधीतरी आपणही सर करायचे असा विचार मनात घोळत होता. पण मनात एक भीती पण होती. कारण या शिखराने भल्या भल्यांना आपला रूद्र अवतार दाखवला आहे. भारतातून आतापर्यंत फक्त ४ जणांनी या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. त्यामुळे मनात शंकांचे काहूर होते. तरी पण शिखर चढाईचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. आणि ते यशस्वी करुन दाखवले.
१६ आॅक्टोबरला भगवान नेपाळमधे दाखल झाला. लुक्ला- फाकडिंग- नामचे बाझार- पांगबोचे असा ट्रेक करत २३ आॅक्टोबर रोजी भगवान चवले १५००० फुटावरील बेस कँपला दाखल झाले. दोन दिवस अक्लमटायझेशन आणि टेक्निकल ट्रेनिंगची प्रॅक्टिस तेथे झाली. २६ आॅक्टोबरला वरच्या कँपवर अक्लमटायझेशनसाठी निघाले. कँप १ हा १९००० फुटांवर आहे. ४००० फूट एकाच दिवसात चढाई केल्याने सुरूवातीला त्रास होतो. हिवाळा सुरू झाल्यामुळे थंडी खूपच वाढली होती. त्यात भगवानने एव्हरेस्टचा डाऊनसुट घातला होता. पण कँप ३ नंतर वारे जोरात वाहू लागले. भयानक थंडी जाणवू लागली. हातापायाची बोटे बधिर होऊ लागली. एकमेकांवर मिटॉन घासून हात गरम ठेवावे लागत होते. पायाची बोटे आतल्या आत हालवणे, क्रँपाँन बर्फात मारून बोटे गरम ठेवण्याचा प्रयत्न करावा लागत होता. मधे मधे काही गिर्यारोहक परत फिरताना भेटत होते. त्यामुळे भगवानच्या मनात भीती निर्माण होत होती. त्यात मागच्या ५ दिवसांपासून लुजमोशनसाठी अँटी बायोटीक्स खात असल्यामुळे विकनेस पण होता आणि पोटही दुखत होते. पण दोनच पर्याय पुढे होते. वरच्या गिर्यारोहकाच्या चढाईदरम्यान वरून सुटणारे बर्फाचे तुकडे डोक्यावर जोरात आदळत होते. अखेरचा टप्पा संपता संपत नव्हता. शेवटी तो क्षण आला. सकाळचे ६ वाजून ७ मिनिटाने मी आणि माझा छांग्बा शेर्पा आणि दुसऱ्या टीमधील ३ गिर्यारोहक असे ५ जण प्रथम शिखरावर पोहोचलो. तिरंगा आणि भगवा फडकला. मनात आनंदाचे काहूर माजले होते. डोळ्यांतून आनंदाश्रू वाहात होते.
जिवघेणा हँगिंग सिरॅक व २१ तासांची चढाई
शिखर उतरताना खूप जपून उतरावे लागत होते. त्यात हे शिखर खूपच वेगळे होते. एकच रोप असल्यामुळे वर चढणारे आणि खाली उतरणारे गिर्यारोहक यांमुळे थोडी अडचण पण निर्माण झाली होती. वाटेत पुन्हा एकदा वाºयाने झोडपायला सुरूवात केली. कँप ३ वर आल्यावर समोर दिसणारा हँगिंग सिरॅक मनात धडकी घालत होता. आतापर्यंत कित्येक जणांना त्याने आपल्या कवेत घेतले आहे. उतरताना फारच जपून चालावे लागत होते. दुपारी १ वाजता आम्ही कँप २ वर सुखरूप पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला.