मुळशीतला तरुण सर करणार एव्हरेस्ट, ५ एप्रिलला सुरू होणार मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:50 AM2018-03-06T02:50:57+5:302018-03-06T02:50:57+5:30
जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टचे अनेक गिर्यारोहकांना आकर्षण असते. असेच आकर्षण मुळशी तालुक्यातील लव्हार्डे (ता. मुळशी) येथील एका तरुणाला असून, एव्हरेस्ट सर करण्याच्या ध्येयाने त्याला पछाडले आहे. भगवान भिकोबा चवले असे या युवकाचे नाव असून याआधीही त्याने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला आहे.
भूगाव - जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टचे अनेक गिर्यारोहकांना आकर्षण असते. असेच आकर्षण मुळशी तालुक्यातील लव्हार्डे (ता. मुळशी) येथील एका तरुणाला असून, एव्हरेस्ट सर करण्याच्या ध्येयाने त्याला पछाडले आहे. भगवान भिकोबा चवले असे या युवकाचे नाव असून याआधीही त्याने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वादळामुळे त्याला मागे फिरावे लागले होते. पुन्हा हे शिखर सर करण्यासाठी भगवान सज्ज झाला असून, प्रचंड इच्छाशक्ती, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर तो ५ एप्रिलला पुन्हा चढाईला सुरुवात करणार आहे.
नोकरी सांभाळत भगवान हा गेल्या ४ वर्षांपासून एव्हरेस्टच्या चढाईसाठी सातत्याने शारीरिक परिश्रम करीत आहे. २०१७मध्ये भगवान एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेला होता. चढाईच्या अंतिम टप्प्यावर असताना भगवान वादळी वाºयामध्ये सापडला. फक्त १०० मीटर शिखरमाथा बाकी असताना त्याला खाली परतावे लागले होते. मात्र, त्याने एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द सोडली नाही. एव्हरेस्ट मोहिमेसाठी भगवान ५ एप्रिलला कूच करणार आहे. ही मोहीम ६० दिवसांची असून, एव्हरेस्टसाठीचा त्याचा मुख्य प्रवास ५ एप्रिल रोजी काठमांडू येथून सुरू होईल. पुढे साधारणत: मे महिन्याच्या मध्याला किंवा अखेरीस भगवान ‘एव्हरेस्ट’च्या समीट पॉर्इंटवर चढाई करेल. चार वर्षांपासून तो या मोहिमेची तयारी करीत आहे. त्यासाठी तो वेगवेगळे शारीरिक सराव करतो. दर शनिवारी अंगावर २० किलो वजन घेऊन तो सिंहगडावर चढाई करतो. वीस किलो वजनासह पर्वतीही दहा वेळा चढतो. सुमारे दीडशे किलोमीटर सायकलिंग, सह्याद्रीच्या डोंगररांगांतील घाटवाटांचा ट्रेक करणे या त्याच्या नित्याच्या कसरती चालू आहेत.
मोहीम यशस्वी करण्यासाठी भगवानकडे जिद्द, आत्मविश्वास आहे; पण थोडीफार कमतरता जाणवते ती पैशांची. या मोहिमेचा खर्च २६ लाख रुपये आहे. जगाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन भगवान भारताचा तिरंगा फडकविणार आहे. त्यामुळे त्याच्या या मोहिमेला चहूबाजूंनी मित्र, सहकारी तसेच नातेवाईक यांचा मदतीचा ओघ या वर्षीसुद्धा चालूच आहे; परंतु खर्चाचा आकडा मोठा असल्याने अजूनही आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता आहे.
विविध मोहिमांत भाग
दोन वर्षांपूर्वी भगवानने हिमालयातील स्टॉक कांग्री, घोलप कांग्री, भागीरथी व आयलंड शिखर ही सुमारे २० हजार फूट उंचीची शिखरे सर केली आहेत. तर, नाणेघाटातील खडापारशी, शहापूर (जि. ठाणे) येथील माहुली गडाजवळील वजीर, लोणावळ्यातील नागफणी, रायगडमधील लिंगाणा, मुळशीतील तैलबैला आणि मावळातील ढाक बहिरी या सह्याद्रीच्या डोंगररांगांतील जीवघेण्या सुळक्यांवर चढाई केली.
सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये आतापर्यंत अडीचशे वेळा त्याने ट्रेकिंग केले आहे. २००२मध्ये रायफल शूटिंग स्पर्धेत त्याने राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक व २००३मध्ये शिडाच्या जहाजाच्या स्पर्धेतही कांस्यपदक मिळविले. २००४मध्ये आलेल्या त्सुनामीच्या वेळी केरळ येथे एक महिना राहून त्याने आपद्ग्रस्तांची सेवा केली.