सरपंचपदासाठी होणार बहुरंगी लढती; मोठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 06:49 AM2017-10-06T06:49:45+5:302017-10-06T06:49:59+5:30
जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला निवडणुका होत असून गुरुवारी (दि. ५) अर्ज माघारीचा शेवटचा दिवशी बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले.
पुणे : जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला निवडणुका होत असून गुरुवारी (दि. ५) अर्ज माघारीचा शेवटचा दिवशी बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. काही ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल उमेदवारी अर्जातून स्पष्ट होत आहे.
आंबेगाव तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून सरपंचपदासाठी ५६ उमेदवार उभे आहेत. तर २०८ सदस्यापदांपैकी ६८ बिनवीरोध झाले आहेत व १४० जागेंसाठी २७२ उमेदवार उभे आहेत.
सरपंचपदामध्ये आहुपे, नागापूर, नारोडी या तीन ग्रामपंचायतींची सरपंचपदे बिनविरोध झाली. आहुपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रमेश लोहकरे, नागापूरच्या सरपंचपदी वैशाली संजय पोहकर, नारोडीच्या सरपंच कैलास तुकाराम काळे हे बिनवीरोध झाले. तर फलौंदे ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने हि जागा रिक्त राहिली.
घोडेगाव, धामणी, चांडोली बुद्रूक, मेंगडेवाडी येथील ग्रामपंचायतींमध्ये एकही उमेदवार बिनविरोध निवडला गेला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणूका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. तर डिंभे खुर्द, नारोडी, रांजणी, चिंचोडी, निघोटवाडी येथील ग्रामपंचायतींवर एक किंवा दोन सदस्य बिनविरोध झाल्याने यादेखील ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. फलौंदे व तळेघर ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी देखील कुठणीही अर्ज भरला नाही. त्यामुळे या दोन ग्रामपंचायती रिक्त राहिल्या.
वेल्ह्यात २८ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी ३९ उमेदवार रिंगणात आले असून २८ ग्रामपंचायतीपैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
२८ ग्रामपंचायतीमधून एकूण ७५ अर्ज आले होते. त्यापैकी २५ उमेदवारांनी माघार घेतली तर ११ गावचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर आंबेगाव खुर्द व गिवशी ग्रामपंचायतीमधून सरपंच पदासाठी अर्जच आले नाहीत.
वेल्हे खुर्द, दापोडे, आंबेगाव खुर्द, बोरावळे, चिरमोडी, लव्ही बुद्रुक, वाजेघर बुद्रुक, कोलंबी, मोसे बुद्रुक, सोंडे कार्ला रा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर तालुक्यातील शिरकोली, हारपूड, बालवड, टेकपोळे, शेनवड, गिवशी, कोशिमघर, कोंडगाव, गोंडेखल, वडघर, गुंजवणे, सोंडे, हिरोजी, सोंडे सरपाले, सोंडे माथना, जाधववाडी, धानेप, पाल बुद्रुक, केळद, आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत.
सरपंचपदाच्या ९ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात
लोणी काळभोर : हवेली तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये गुरूवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सरपंच पदासाठी असलेल्या ९ जागांसाठी ४४ तर सदस्यपदाच्या १०५ जागांसाठी २६९ उमेदवार निवडणूक रिंगणांत उभे असल्याची माहिती तालुका निवडणूक अधिकारी सुनील शेळके यांनी दिली.
यांमधील पेरणे गावातील ३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. फुरसुंगी गावात सरपंचपदासाठी तब्बल १६ जण उभे असल्यामुळे व बहुतांश ठिकाणी दोनपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने बहुरंगी लढती होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया हवेली तालुक्यांतील कदमवाकवस्ती, फुरसुंगी, आव्हाळवाडी, पेरणे, बुर्केगाव, अहिरे, नांदोशी, पिंपरी-सांडस व गोगलवाडी या नऊ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. गुरुवारी
उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांची झुंबड उडाली होती.
प्रामुख्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद आजमविण्याचा निर्णय घेऊन उमेदवारांचे पॅनल तयार केले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढत होत असल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्याही कमालीची वाढली आहे. तालुक्यांतील ९ ग्रामपंचायतींतील १०५ सदस्य व ९ सरपंच अशा एकूण १२४ जागांसाठी येत्या १६ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ४६६ उमेदवारांनी, तर सरपंचपदासाठी ७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
जेथे जास्त बंडाळी झाली आहे. अशा नाराज बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वेळेपर्यंत करण्यात आले. काही जणांनी अर्ज माघारी घेतले. परंतु काहींनी बंडाचे निशाण आणखीन जोमात फडकावणार असल्याचे घोषित केले.
मुळशीत सात ग्रामपंचायती बिनविरोध
पौड : ग्रामपंचायत व सरपंच पदाच्या निवडणुकीच्या दुसºयाा टप्याच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत मुळशी तालुक्यातील ११ ग्रामपंचायती पैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
११ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी एकूण ८० अर्ज आले होते. त्यापैकी दोन अर्ज बाद झाल्याने एकूण ७८ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले होते तर सरपंच पदासाठी २८ आले होते त्यापैकी सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले होते. पाथरशेत, तव, कोंढूर, लवार्डे, मोसे खुर्द, वांजळे व दासवे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक ग्रामस्थ व नेते मंडळीना यश आले. अन्य आसदे, आडमाळ, भोडे व माळेगाव चार ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या १६ नोव्हेंबर रोजी होईल. भोडे ग्रामपंचायतीत एकही सदस्य बिनविरोध झाला नाही या ठिकाणी सर्व जागांसाठी निवडणूक होईल. आसदे व भोडे या ठिकाणी सरपंच पदासाठी प्रत्येकी ५ उमेदवार रिंगणात असतील. माळेगाव येथे सरपंच पदासाठी ४ उमेदवार, आडमाळ येथे एका वार्डाातील एका सदस्य पदासाठी २ उमेदवार तर सरपंच पदासाठी २ उमेदवार असतील.
कोंडूर ग्रामपंचायत
बिनविरोध करून पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी व पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे यांनी वेगळा आदर्श निर्माण करून दिला. भोडे व आसदे येथील सरपंचपदाची निवडणूक सर्वाधिक अटीतटीची होणार आहे.
बारामतीत सरपंचपदासाठी ३८, तर सदस्यपदासाठी २६३ उमेदवार रिंगणात
बारामती : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सरपंचपदासाठी ५२ तर सदस्य पदासाठी २१८ नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आली आहेत. सरपंचपदासाठी ३८ तर सदस्य पदासाठी २६३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ४ ग्रामपंचायतींचे एकूण २५ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत, अशी माहिती तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिली.
लोणी भापकर, काºहाटी, सोनकसवाडी, वाणेवाडी, कुरणेवाडी, मासाळवाडी, मुरूम, मोरगाव, पळशी, गडदरवाडी, पणदरे, सोरटेवाडी, वाघळवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
त्यापैकी बिनविरोध सदस्यपदी निवडून आलेले गाव व उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे - काºहाटी - २, सोनकसवाडी - ६, वाणेवाडी - ७, मुरुम - १० अशी एकूण २५ उमेदवार निवडून आलेले आहेत.
बिनविरोध सरपंचपदी एकही उमेदवार आला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.