बहुराष्ट्रीय ‘ब्रँड’ पुण्यात कचरा करण्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:31 AM2020-12-04T04:31:29+5:302020-12-04T04:31:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नेसले, कोकाकोला व युनिलीव्हर हे आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्स् पुण्यातील प्लॅस्टिक कचऱ्यामध्ये सर्वाधिक भर घालत असल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नेसले, कोकाकोला व युनिलीव्हर हे आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्स् पुण्यातील प्लॅस्टिक कचऱ्यामध्ये सर्वाधिक भर घालत असल्याचे दिसून आले. स्थानिक ‘ब्रॅंडस’मध्ये चितळे, अमूल व गोकुळ यांची संख्या त्यांच्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या दूध पिशव्यांमुळे सर्वाधिक दिसून आली. संख्यात्मक प्रमाण पाहता चितळे ब्रँडच्या पिशव्या पुण्यातील प्लॅस्टिक कचऱ्यात सर्वाधिक आढळून आला.
स्वच्छ संस्थेच्या ‘ब्रेक फ्री फ्रॉम प्लॅस्टिक’ या वार्षिक उपक्रमांतर्गत पुण्यातील प्लॅस्टिक कचऱ्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. निम्न, मध्यम व उच्चवर्गातील एकूण एक हजार घरांमधील कचऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात आला. यातून हे निष्कर्ष काढण्यात आले.
प्लॅस्टिक कचऱ्यातील सर्वाधिक प्रमाण हे एकदा वापरुन फेकल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचे होते. पुण्यातील ब्रँड परीक्षण माहितीमध्ये ३९ टक्क्यांहून अधिक प्लॅस्टिक कचरा आणि संख्यात्मक दृष्ट्या ४४% प्लॅस्टिक कचरा हा पुनःचक्रीकरणास अयोग्य असलेला किंवा लहान पाकिटे व निम्न दर्जाच्या प्लॅस्टिकचा असतो. हे प्लास्टिक पुनःचक्रीकरणाच्या उद्योगात तग धरू शकत नाही.
या प्लॅस्टिकचा वापर एकूण ३३५ स्थानिक व आंतरराष्ट्रीय ‘ब्रॅंड्स’ करत असल्याचे आढळून आले. यात नेसले, पार्ले आाणि युनिलिव्हर या कंपन्या आघाडीवर आहेत. बिस्किटे, वेफर्सची वेष्टने, शॅम्पू व केचपची पाकिटे, टुथपेस्टच्या ट्यूब यांचा समावेश असतो. या प्रत्येक पाकिटात प्लॅस्टिक/अँल्युमिनियम /कागद वगैरे अनेक प्रकारचे स्तर असतात ज्यामुळे त्यांना निराळे करून त्यांचे पुनःचक्रीकरण करणे अतिशय कठीण जाते. हे प्लॅस्टिक अखेर पुरले जाते किंवा उकिरड्यांवर टाकले जाते. हा कचरा अनेकदा जाळला जातो त्यातून पर्यावरणास धोकादायक वायू बाहेर पडतात.
--------
चौकट
पुण्यातल्या कचऱ्याचे विश्लेषण
सुका कचरा : एकूण कचऱ्याच्या २५%
प्लॅस्टिक कचरा : सुक्या कचऱ्याच्या २५% , एकूण कचऱ्याच्या ६%
पुनःचक्रीकरण शक्य नसलेला प्लॅस्टिक कचरा : प्लॅस्टिक कचऱ्याच्या ३९%
पुनःचक्रीकरण शक्य असलेला प्लॅस्टिक कचरा : प्लॅस्टिक कचऱ्याच्या ६१%
चौकट
प्लास्टिकचा पिछ्छा
• एकूण प्लॅस्टिक कचऱ्यातील सर्वाधिक घटक, ४४% प्लॅस्टिक, हे पुनःचक्रीकरण न होऊ शकणारे बहुस्तरीरय व त्याच्या खालोखाल २७% प्लॅस्टिक, हे एकस्तरीय अर्थात एलडीपीई होते.
• एकूण प्लॅस्टिक कचऱ्यापैकी ७६% हे अन्नपदार्थांच्या वेष्टणाकरिता वापरले गेलेले प्लॅस्टिक होते