बहुउद्देशीय भवनाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:28 AM2017-08-18T01:28:31+5:302017-08-18T01:28:33+5:30

पुणे महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून बाणेर रस्त्यावर सिंजेंटा कंपनीच्या अलीकडे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय भवनाची अर्धवट काम व प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे भवन आणि त्यातील सुविधांची दुरवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे

Multipurpose Furnace Shade | बहुउद्देशीय भवनाची दुरवस्था

बहुउद्देशीय भवनाची दुरवस्था

Next

बाणेर : पुणे महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून बाणेर रस्त्यावर सिंजेंटा कंपनीच्या अलीकडे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय भवनाची अर्धवट काम व प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे भवन आणि त्यातील सुविधांची दुरवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे.
बांधकामात अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून करदात्यांच्या पैशाचा अपहार झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत असून, स्लॅब लिकेजमुळे इमारतीच्या आतून काळ्या रंगाच्या बुरशीसह सर्वत्र ओल पसरली आहे. इमारतीच्या दोन्ही मजल्यांवरील अनेक कापडी पडदे गायब असून सर्वत्र कचरा व धुळीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहाची सर्व कामे अपूर्ण असून टेरेसवरील वॉटरप्रूफिंगचे कामही अर्धवट आहे. त्यामुळे ज्या उद्देशातून, विचारातून व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी म्हणून हे भवन बांधण्यात आले होते. त्या भवनाची सध्याची अवस्था लक्षात घेता भवनाचा उद्देश मागे पडला आहे.
भवनाचे काम सध्या अर्धवट स्थितीत जरी असले तरी उद्घाटन मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींनी उरकले असल्याचे दिसून येत आहे. भवनाच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात आला असून, रात्री असामाजिक तत्त्वांकडून जुगार व मद्य पार्ट्या येथे होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. एकूणच भवनाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही वास्तू असामाजिक तत्त्वांच्या विळख्यात आली आहे. दरम्यान, भवनाची सर्व अर्धवट कामे पूर्ण करून, सुरक्षा व्यवस्था तैनात करून, नियमित स्वच्छता ठेवून या वास्तूचा उपयोग होण्याच्या दिशेने पालिका प्रशासनाने उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.
बहुउद्देशीय भवनाचे फाटक, प्रवेशद्वार उघडे असल्याचे निदर्शनास आले असून, या भवनात कोणत्याही वेळी कोणीही प्रवेश करू शकतो आणि वाईट गोष्टी या ठिकाणी घडू शकतात. संपूर्ण भवनाचा परिसर खुला असल्यामुळे चकाट्या मारण्याचे हे केंद्र बनले असल्याचे दिसून
येत आहे.
>विकासकामे उत्तम दर्जाची व्हावी, यासाठी कंत्राटदारांकडून यापुढील काळात सुधारणा अपेक्षित आहे. जे कंत्राटदार निकृष्ट कामे करतील, त्यांची बिले रोखली जातील. बहुउद्देशीय भवनाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून गुण नियंत्रक (क्वालिटी कंट्रोल) यांनी कामाची तपासणी करावी, अशी मागणी मी संबंधित विभागाकडे करणार आहे.
- स्वप्नाली सायकर,
नगरसेविका

Web Title: Multipurpose Furnace Shade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.