इंटरनेटच्या युगात टपाल विभागही झाले मल्टिपर्पज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:23 AM2018-12-19T01:23:00+5:302018-12-19T01:23:17+5:30
ई-कॉमर्स पोर्टल लाँच : अत्यंत कमी किमतीत चांगल्या वस्तू विकत घेता येणार
आंबेठाण : आजच्या इंटरनेट युगात टपाल विभागही ‘मल्टिपर्पज’ झाले आहे. टपाल विभाग ‘ई’ सुविधेवर जोर देऊन ग्राहकांना नवीन योजना व सुविधा उपलब्ध करून देत आहे.तसेच ई-कॉमर्स व्यवसायात पोस्टाने दमदार एंट्री केली आहे. नुकतेच भारतीय पोस्टाकडून ई-कॉमर्स पोर्टल लाँच केले असून, या पोर्टलवरून ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत चांगल्या वस्तू विकत घेता येणार आहेत. विशेष म्हणजे म्हणजे देशातल्या गावागावात पोस्टमन जात असल्याने आपण एखाद्या खेड्यातून मागवलेली वस्तूही घरपोच मिळणार आहे.
टपाल विभागाने ‘ई-मेल’, ‘कुरिअर’च्या जगात आपली विश्वासार्हता कायम ठेवली आहे. ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी नेहमी प्रयत्नशील राहून नवनवीन योजना राबविण्यात येत असतात. यामुळे चाकण सारख्या औद्योगिक दृष्ट्या विस्तारत्या भागामध्ये ग्राहकांना खासगी कुरिअर सेवेपेक्षा चांगली सुविधा देऊन आपला ग्राहकवर्ग जवळ करण्यात येत आहे. आज इंटरनेट, ई-मेल तसेच खासगी कुरिअर कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी टपाल विभागाही मोठ्या जोमाने काम करत आहे. खासगी कंपन्यांपेक्षाही अधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न पोस्टाकडून केला जातो आहे. यात टपाल विभागाने नवीन योजना सुरू करून विजेसह दूरध्वनी बिल भरणा करण्यासाठी ‘ई-पेमेंट’ सुविधा; त्याचप्रमाणे किसान विकासपत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, रिकरिंग डिपॉझीट अशा काही सुविधा सुरू केल्या आहेत.
ग्राहकांची विश्वासार्हता कायम
४मोबाईल व इंटरनेटची सुविधा सुरू होण्यापूर्वी नातलगांना कोणताही संदेश देण्यासाठी पोस्टकार्डाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असे; परंतु आज पोस्टकार्डाचा वापर कमी झाला आहे. याला पर्याय म्हणून ‘ई-पोस्ट’ची सुविधा आहे. आजही ग्राहकांची टपाल विभागावर विश्वासार्हता कायम आहे.
घरबसल्या नव्या योजनांचा लाभ
४टपाल विभाग जुना असला, तरी स्पर्धेच्या युगात ग्राहकांच्या अपेक्षेनुसार नवीन योजना सुरू केल्या. त्यात ई- सुविधांचा समावेश आहे. ‘ई-पोस्ट’, ‘ई-पेमेंट’ या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.या सुविधांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहक आॅनलाइन देवाण-घेवाणीचे व्यवहारही करू शकणार आहे. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून विविध प्रकारची खाती उघडू शकणार आहे.
खेड तालुक्याच्या ग्रामीण भागासह औद्योगिक क्षेत्रात पोस्टखात्यावरच ग्राहकांचा सर्वात जास्त विश्वास आहे. टपाल विभागाने सुरू केलेल्या बहुतेक योजनांचा लाभ नागरिकांकडून घेतला जातो आहे. त्यामुळे व्यवसायही जास्त आहे. सगळी कामे वेळेत व घरपोच केली जात आहेत.
- दिलीप मांडेकर, पोस्ट मास्टर, आंबेठाण