मुंबईतील स्फोटांचे पुणे कनेक्शन
By admin | Published: October 1, 2015 01:13 AM2015-10-01T01:13:43+5:302015-10-01T01:13:43+5:30
मुंबईच्या लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी बुधवारी दहशतवाद्यांना फाशीची तसेच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली
पुणे : मुंबईच्या लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी बुधवारी दहशतवाद्यांना फाशीची तसेच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या बॉम्बस्फोटांचे पुणे कनेक्शनही या घटनेमुळे समोर आले होते. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये पुण्याच्या लष्कर भागातील सोहेल शेख याचा समावेश आहे. तर पुण्यातील रहिवासी असलेले आरोपी मोहम्मद रिझवान डावरे आणि राहिल अतुर रहमान शेख हे गेले दहा वर्षे फरार आहेत. मुंबईतील ७/११ चा बॉम्बस्फोट घडविण्यात या तिघांचा मोठा हात होता.
सोहेल मेहबूब शेख (वय ४३, रा. भीमपुरा, लष्कर) हा केंद्र शासनाने बंदी घातलेल्या सिमी संघटनेचा हस्तक आहे. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावर दहाव्या दिवशीच त्याच्या तपास यंत्रणांनी राहत्या घरामधून मुसक्या आवळल्या होत्या. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो अन्य आरोपींसोबत पाकि स्तानात गेला होता. इराणमधील जियारत या धार्मिक कार्यक्रमासाठी व्हिसा मिळवून तो प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेला होता. दहशतवादी प्रशिक्षण घेतल्यानंतर आरडीएक्सची मोठी तस्करी करण्यात आली होती. त्याचाच वापर करून बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या बॉम्बस्फोटाचा कट पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या आझम चिमा याने आखला होता. सोहेल याच्यावर ६ डिसेंबर २००२ रोजीचा मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळील बॉम्बस्फोट, २७ जानेवारी २००३ रोजीचा मुंबईमधील विलेपार्ले येथील मार्केटमधील बॉम्बस्फोट, १३ मार्च २००३ मधील मुलुंड रेल्वेमधील बॉम्ब स्फोटप्रकरणीही गुन्हे दाखल आहेत.
तर दहा वर्षांपासून फरार असलेल्या रिझवान मोहम्मद डावरे (वय ४०, रा. २०३-बी, प्रेमानंद पार्क, शिवरकर रस्ता, वानवडी) आणि राहिल अतुर रेहमान शेख (रा. बी -१,/२४, कुबेरा गार्डन, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) या दोघांनी बॉम्बस्फोटांसाठी आर्थिक रसद उभी केली होती. हवालाच्या माध्यमातून साडेतीन लाख रुपये पुरवण्यात आले होते. हे दोघेही पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये वेष पालटून राहत असल्याची तपास यंत्रणांची माहिती आहे.