सलग सुट्टयांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वे झाला 'स्लाे'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 04:57 PM2020-02-21T16:57:14+5:302020-02-21T16:59:19+5:30
सलग सुट्ट्या आल्याने पर्यटक विविध ठिकाणी फिरण्यास बाहेर पडल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती.
लोणावळा : शनिवार रविवारच्या सुट्टयांना जोडून आलेली महाशिवरात्रीची सुट्टी यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खाजगी वाहनातून घराबाहेर पडल्याने मुंबईपुणे एक्सप्रेस वेवर भल्या पहाटेपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागेल आहेत. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने एक्स्प्रेस वेचा वेग सकाळपासून मंदावला आहे.
खालापूर टोल नाक्यावर लांबवर वाहनांच्या रांगा लागल्याने फास्ट टॅगपासून सर्वच यंत्रणा कोलमंडली आहे. टोल भरण्याकरिता वाहनांना मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. तर दुसरीकडे खंडाळा घाट चढायला सुरुवात केल्यानंतर फुडमाॅल ते खंडाळा दरम्यान मुंगीच्या संथ गतीने वाहने पुढे सरकत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने वेग कमी झालेला असताना घाटाचा अवघड टप्पा चढताना काही ठिकाणी अवजड वाहने बंद पडणे, गरम होणे असे प्रकार होत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडत आहेत. तीन दिवस सलग सुट्टया मिळाल्याने अनेकांनी लोणावळ्यासह कोल्हापुर, महाबळेश्वर, भिमाशंकर, शिर्डी, पंढरपुर आदी पर्यटनस्थळी तसेच देव दर्शनाचा बेत आखत घराबाहेर पडणे पसंत केले. सकाळी सकाळी वाहतुक कोंडी टाळण्याकरिता सर्वच बाहेर पडल्याने सकाळीच घाट परिसरात वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. बोर घाट पोलीस व खंडाळा टॅप पोलीस वाहतुक सुरळीत ठेवण्याकरिता प्रयत्न करत असले तरी ते वाहनांच्या संख्येपुढे कुचकामी ठरत आहेत.