किवळे ते तळेगाव दरम्यान द्रुतगती महामार्ग बंद; वाहन चालकांची गैरसोय
By विश्वास मोरे | Published: August 26, 2022 02:03 PM2022-08-26T14:03:47+5:302022-08-26T14:10:56+5:30
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या- येणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय...
पिंपरी:पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे ते तळेगाव दरम्यान शुक्रवारी दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये मेगाब्लॉक करण्यात आला. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग या नावाची कमान बसविण्यात येणार असल्याने मेगा ब्लॉक करण्यात आला होता. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या- येणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय झाली.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे ते तळेगाव सोमाटणे टोलनाका या दरम्यान आज मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार बंगळूर हायवेने मुंबईकडे जाणाऱ्या मुकाई चौकातून जुन्या महामार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती.
मेगा ब्लॉकची माहिती नसल्याने मोठ्या प्रमाणावर कोल्हापूर, पुणेहुन मुंबईला जाणारी वाहने एक्सप्रेस हायवेकडे येत होती. महामार्ग प्रवेशद्वार येथेच बॅरिकेट लावले होते. मात्र वाहतूक पोलिसांच्या वतीने त्यांना जुन्या पुणे मुंबई हायवेने सांगितले जात होते.
तसेच महामार्गावर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग या नावाची कमान बसविण्याचे काम सुरू होते. दुपारची वेळ असल्याने या महामार्गावर वाहनांची संख्या कमी प्रमाणात दिसून आली. दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी लेन सुरू ठेवण्यात आली होती.