मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 10:05 PM2023-07-27T22:05:51+5:302023-07-27T22:06:19+5:30
कामशेत बोगद्याच्या तोंडावर ९ च्या सुमारास घडली घटना, दगड व माती बाजूला काढण्याचे काम सुरू
Mumbai Pune Expressway traffic jam, landslide: गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रचंड पाऊस कोसळत आहे. विविध ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होतानाच्या बातम्या येत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईपुणे एक्स्प्रेस वे वर देखील दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आज पुन्हा एकदा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगदाच्या तोंडावर दरड कोसळली आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून दरडीचे दगड व माती बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
कामशेतचा बोगदा संपल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर ही दरड कोसळली आहे. या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाल्याचे चित्र आहे. खंडाळा घाटातील धोकादायक दगड काढण्याचे काम झाल्यानंतर दुपारच्या सुमारास मुंबईकडे जाणारा रस्ता सुरू करण्यात आला होता. दरड कोसळण्याच्या घटना पाहता, गेले दोन दिवस या मार्गावर दुपारी २-२ तासांचे ब्लॉक घेऊन काम करण्यात आले आहे. पण तरीही आज रात्रीच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे. सध्या महामार्गावरील देवदूत यंत्रणा आणि आय आर बी चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मार्गावर आलेले दगड व माती बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.
मुंबईकडे जाणारी एक लेन सुरू; दगड-मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू#MumbaiPuneExpress#LANDSLIDEpic.twitter.com/591n4IkpVN
— Lokmat (@lokmat) July 27, 2023
कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आठ ते सव्वा आठच्या सुमारास दरड कोसळली. मात्र एक लेन सुरू असून आयआरबी च्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही दरड हटवून वाहनांसाठी रस्ता सुरळीत करण्यात येईल. - महामार्ग पोलीस