मुंबई-पुणे प्रवासात गुंगीचे औषध देऊन लुबाडण्याचे प्रकार पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:11 AM2021-05-07T04:11:10+5:302021-05-07T04:11:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुलाच्या लग्नासाठी दादर-पुणे एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेला गुंगीचा पेढा खाण्यास दिला. नंतर ससून रुग्णालयात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुलाच्या लग्नासाठी दादर-पुणे एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेला गुंगीचा पेढा खाण्यास दिला. नंतर ससून रुग्णालयात नेऊन एक्स-रे काढण्याचा बहाणा करुन अडीच लाख रुपयांचा ऐवज एका महिलेने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी काळ्या रंगाचा कुर्ता व काळ्या रंगाची सलवार परिधान केलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुंगीची बिस्किटे देऊन प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्यांकडून प्रवाशांना लुबाडण्याच्या घटना यापूर्वी अनेक घडल्या आहेत. आता हा प्रकार पुन्हा सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी मुंबईतील ५० वर्षांच्या महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही महिला आपल्या मुलाच्या लग्नासाठी एसटीने २८ एप्रिल रोजी पुण्यात येत होत्या. या वेळी त्यांच्याबरोबर एक महिला प्रवास करीत होती. तिने प्रवासादरम्यान फिर्यादी यांची सर्व माहिती काढून घेतली. तिने आपल्याबरोबर आणलेला पेढा फिर्यादीला खायला दिला. हा पेढा खाल्ल्यानंतर फिर्यादींना गुंगी येऊ लागली. त्यांची जीभ जड होऊ लागली. त्यामुळे या महिलेने त्यांना पुण्यात उतरल्यावर ससून रुग्णालयात आणले. तेथे त्यांना तुमचा एक्स-रे काढायचा आहे. त्यामुळे अंगावरील सर्व दागिने काढून द्या, अशी बतावणी केली. त्यांनी गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग असा २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज या महिलेकडे दिला. त्यानंतर फिर्यादीची नजर चुकवून ही महिला पळून गेली. काही वेळानंतर फिर्यादी या शुद्धीवर आल्यावर त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.