मुंबईचे नियम पुण्याला लागू होणार; दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 04:33 PM2021-08-10T16:33:57+5:302021-08-10T16:38:49+5:30
पुणे - लोणावळा , पुणे - दौंड प्रवासाची १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
पुणे : राज्य सरकारने मुंबईत लोकलवरील निर्बंधात काही अंशी सूट देऊन सामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे - लोणावळा लोकल व पुणे - दौंड डेमू प्रवासासाठी सामान्यांना परवानगी दिली जाणार आहे. मात्र, त्यांसाठी प्रवाशांचे दोन डोस झाले पाहिजेत आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी व्हायला हवा. यासाठी प्रवाशांना आवश्यक असणारा फोटोपास पोलीस प्रशासनकडून दिला जाणार आहे. लवकरच याबाबतची कार्यवाही सुरू होईल.
सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासास परवानगी द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. ती या निमित्ताने पूर्ण होत आहे. पुणे - लोणावळा लोकलच्या दिवसातून चार फेऱ्या होत आहे. तर पुणे - दौंड दरम्यान देखील दिवसातून चार फेऱ्या होत आहे. सध्या तरी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबाबत रेल्वेने कोणताही विचार केला नाही. तसेच या बाबत अद्याप कोणाकडूनही फेऱ्या वाढविण्याची मागणी झालेली नाही. प्रवाशांची संख्या पाहून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
पास देण्याची व्यवस्था पोलिसांची
लोकलने प्रवास करणाऱ्यांना फोटो असलेला पास दिला जाईल. तो पास असेल तरच त्यांना लोकलचे तिकीट दिले जाईल. यासाठी प्रवाशांनी पोलीस प्रशासनाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करून निकषात बसणाऱ्या प्रवाशास पास दिला जाईल.