ढोल-ताशा स्पर्धेत मुंबईचे पार्लेस्वर पथक प्रथम, पुण्याचे शिवसाम्राज्य पथक द्वितीय स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:17 AM2018-08-13T02:17:22+5:302018-08-13T02:17:52+5:30
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत वेंकिज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत मुंबईच्या पार्लेस्वर ढोल-ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकाविला.
पुणे - शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत वेंकिज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत मुंबईच्या पार्लेस्वर ढोल-ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, पुण्याच्या शिवसाम्राज्य पथकाने द्वितीय क्रमांक आणि चिपळूणच्या कालभैरव पथकाने तिसरा क्रमांक मिळवला.
नातूबाग पटांगण येथे स्पर्धेची महाअंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वेंकिज उद्योगसमूहाचे संचालक बालाजी राव, जगदीश बालाजी राव, माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील,
पालकमंत्री गिरीश बापट, नगरसेवक राजेश येनपुरे, महेश लडकत, अॅड. प्रताप परदेशी, बाबू वागस्कर, अनिल जाधव, पराग ठाकूर, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव तसेच कलाकार नेहा गद्रे, वैष्णवी पाटील, स्वराज्यरक्षक संभाजी फेम प्राजक्ता गायकवाड, सचिन गवळी यांसह अनेक कलाकार उपस्थित होते.
ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत राज्यभरातून पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आदी भागांतील पथके सहभागी झाली होती. वेंकिज उद्योग समूहाच्या स्पर्धेला विशेष सहकार्य मिळाले.
विजेत्या पार्लेस्वर पथकला ५ लाख रुपये, द्वितीय शिवसाम्राज्य पथकाला ३ लाख रुपये, तृतीय क्रमांकाबद्दल कालभैरव पथकाला २ लाख रुपये, चतुर्थ क्रमांकावरील भिवंडीच्या शिवाजीनगर पथकाला १ लाख व पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या पुण्याच्या ऐतिहासिक पथकाला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक व मंडईची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह दिले.
याशिवाय वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट ढोलवादक म्हणून पार्लेस्वर पथकाचा शुभम कोंढाळकर, ताशावादक वसईच्या अविष्कार पथकाचा रुपेश कदम, ध्वजधारी म्हणून शिवाजीनगर पथकाची भाग्यश्री चौगुले यांना गौरविले. तर, उत्कृष्ट तालाचे पारितोषिक देवगडच्या रवळनाथ पथकाला प्रदान केले.
उत्कृष्ट ढोल वादक, उत्कृष्ट ताशा वादक, तसेच उत्कृष्ट ताल वादकास प्रत्येकी १५ हजार रुपयांचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
गुलाब कांबळे, राजन घाणेकर, गिरीश सरदेशपांडे, राजहंस मेहेंदळे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. एंजल ग्रुप या वैष्णवी पाटील यांच्या ग्रुपने गणेशवंदना सादर केली.