भीमा-पाटस कामगारांचे आठव्या दिवशी मुंडन आंदोलन
By admin | Published: September 23, 2016 02:20 AM2016-09-23T02:20:25+5:302016-09-23T02:20:25+5:30
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनाच्यापोटी बेमुदत आंदोलनाच्या आठव्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल
पाटस : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनाच्यापोटी बेमुदत आंदोलनाच्या आठव्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल आणि संचालक मंडळाच्या विरोधात आंदोलन तीव्र करून कामगारांनी मुंडन करून कारखाना व्यवस्थापनाचा निषेध केला.
भीमा पाटस कारखान्याने दहा महिन्यांपासून कामगारांचे पगार थकवलेले आहेत. पगारासह इतर देणी असे एकूण १९ कोटी रुपयांच्यावर कामगारांची थकीत कारखाना व्यवस्थापनाकडे आहे. मात्र कामगारांची थकीत देण्यासाठी कारखाना व्यवस्थापन काणाडोळा करीत असल्याचा आरोप कामगारांचा आहे.
कामगारांच्या जाहीर सभेत कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत वाबळे म्हणाले की, कामगारांवर मुंडन करण्याची दुर्दैवी वेळ आमदार राहुल कुल आणि त्यांच्या संचालक मंडळाने आणली, ही दुर्दैवाची बाब आहे. वास्तविक पाहता मुंडन आंदोलन आहे. याची जाणीव कुल यांना असतानादेखील ते कामगारांसमोर आले नाहीत. परिणामी मुंडन करण्याची वेळ आली. याचा आम्ही निषेध करतो. केशव दिवेकर म्हणाले की, संचालक मंडळाला कामगारांचे भान राहिलेले नाही. दोन वर्षांपूर्वी कारखाना विस्तारीकरणाला सुरुवात झाली. यात मोठा घोटाळा झाला असून याला जबाबदार कारखान्याचे संचालक मंडळ आहे. या वेळी कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात संताप व्यक्त करून कारखान्याच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)