मुंढवा-मगरपट्टा पोटनिवडणूक होणारच; भाजपा-राष्ट्रवादीत लढत रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:07 AM2018-03-20T03:07:29+5:302018-03-20T03:07:29+5:30
माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या मुंढवा-मगरपट्टामधील प्रभाग क्रमांक २२ क ही रिक्त जागा राष्ट्रवादीच्या पदरात अविरोध पडण्याची शक्यता मावळली आहे.
पुणे : माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या मुंढवा-मगरपट्टामधील प्रभाग क्रमांक २२ क ही रिक्त जागा राष्ट्रवादीच्या पदरात अविरोध पडण्याची शक्यता मावळली आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमतात असलेल्या भारतीय जनता पार्टीने ही जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादीला त्यामुळे आपली जागा कायम ठेवण्यासाठी झगडावे लागण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही जागा गेली अनेक वर्षे आहे. चंचला कोंद्रेच तिथे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ही निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याच घरात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ती मुलीकडे द्यायची की सुनेकडे याचा निर्णय पक्षाने त्यांच्या कुटुंबीयांवर सोपवला आहे.
अद्याप यासंदर्भात काहीही
ठरले नाही असे पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.
भाजपाने मात्र यात आघाडी घेतली असून कोद्रे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुकन्या गायकवाड यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पक्षाचा अधिकृत अर्ज सोमवारीच देण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली.
घोरपडी येथील पक्षाचे उमेदवार दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत कोणीही उमेदवार देऊ नये असे आवाहन पक्षाने केले होते, मात्र त्याला राष्ट्रवादीने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळेच या वेळी पक्षाने त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
कॉँग्रेस, शिवसेनेकडून अद्याप हालचाल नाही
1 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस आहे. मनसेने या जागेवर उमेदवार
न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसने
अद्याप उमेदवार जाहीर
केला नसला तरी राष्ट्रवादीबरोबर आघाडी म्हणून तेही इथे उमेदवारी देण्याची शक्यता नाही.
2शिवसेनेने अद्याप काही जाहीर केलेले नाही. त्यामुळे ही लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्यात होणार असे दिसते आहे. मंगळवारी दुपारी
तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर २१ मार्चपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. ६ एप्रिलला मतदान होणार आहे.