कोरोनाला अटकाव करण्यात पालिकेचे सत्ताधारी अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:23+5:302021-03-24T04:10:23+5:30
पुणे : शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दररोजचा आकडा तीन हजारांच्या घरात पोचली आहे. कोरोनाचा संसर्ग ...
पुणे : शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दररोजचा आकडा तीन हजारांच्या घरात पोचली आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्याला अटकाव करण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून अटकाव करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
कोरोना चाचणीनंतर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची कोणत्याही पद्धतीने नोंद किंवा त्यांची तपासणी केली जात नाही. डॉ. नायडू रुग्णालयामध्ये केसपेपर देण्यासाठी एकच कर्मचारी आहे. तपासणीसाठीही एकच कर्मचारी असल्याचे शिवसेनेने निदर्शनास आणून दिले आहे.
प्रशासनाकडून क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर मधून रक्त तपासण्याचा आणि पाॅझिटिव्ह रूग्णांना स्वतःच्या घरातच विलगीकरणात राहण्याचा आग्रह पालिकेच्या वतीने केला जात आहे. पालिकेच्या रूग्णालयामधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली असून ठेकेदारी सुरू केल्याने रूग्णांना हक्काची मोफत मिळणारी रुग्णसेवा ठेकेदारी पध्दतीमुळे विकत घ्यावी लागत आहे.
जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासोबतच गरिबांसाठी सर्व कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू करणे आवश्यक असल्याचे निवेदन सेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गटनेते पृथ्वीराज सुतार आणि सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे यांनी आयुक्तांकडे केली आहे.