आळंदीतील नगरपालिका चौक प्रवासासाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:27+5:302021-08-18T04:14:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील नगरपालिका चौकातील वळण रस्ता दुचाकी चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. मागील अनेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील नगरपालिका चौकातील वळण रस्ता दुचाकी चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. मागील अनेक दिवसांपासून या वळणावर दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. तर, अनेक जण समोरच्या वाहनांना धडकून जखमी होत असल्याची सत्यस्थिती आहे. अपघातात अनेकांचे हातपाय मोडले आहेत, तर वाहनांचे मोठे नुकसान घडून येत आहे.
आळंदीत तीर्थक्षेत्र विकास आराखडा निधीतून प्रदक्षिणा मार्गांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, रस्त्यांचे रुंदीकरणही करण्यात आले आहे. प्रदक्षिणा मार्गावरील नगरपालिका चौकात पोलीस ठाण्याच्या बाजूकडून नवीन पुलाकडे जाताना उतार वळण रस्ता आहे. मात्र, या उताराच्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम तंतोतंत झालेले नाही. त्यामुळे प्रवासादरम्यान अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. त्यातच पावसाची रिमझिम सुरू असल्याने रस्ता निसरडा होऊन त्याठिकाणी दररोज वाहने घसरून अपघात होत आहेत.
मागील एक महिन्यापासून आजअखेर सुमारे शंभराहून अधिक दुचाकी घसरून पडल्या आहेत. तर दोन दिवसांपूर्वी एक दुचाकी घसरून थेट समोरून येणाऱ्या चारचाकीखाली शिरली होती. विशेषतः असंख्य नवख्या वाहनचालकांना घसरड्या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने प्रवासादरम्यान दुर्घटनेला सामोरे जावे लागत आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी नगरपालिका चौकात आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी अजित वडगांवकर, नंदकुमार वडगांवकर, संदीप नाईकरे, पप्पूशेठ भळगट, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, निसार सय्यद, प्रसाद बोराटे आदींनी केली आहे.
कोट
नगरपालिका चौक दुचाकीस्वारांच्या प्रवासासाठी खूपच धोकादायक ठरत आहे. मागील काही दिवसांपासून डोळ्यासमोर अनेक दुचाकी याठिकाणी घसरून पडल्या आहेत. अशा अपघातात अनेकांच्या शरीराला जखमा झाल्या आहेत. वारंवार अपघात घडूनही अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याचे दुर्दैव्य आहे. स्पीडब्रेकर टाकल्यास कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागेल. तोपर्यंत बॅरिकेट्स लावणे गरजेचे आहे.
- अजित वडगांवकर, स्थानिक ग्रामस्थ.
फोटो ओळ : आळंदीतील नगरपालिका चौकात दुचाकी घसरून वारंवार अशापद्धतीचे अपघात घडत आहेत.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)