भाडेकरूंवर महापालिकेची मेहरनजर
By admin | Published: June 29, 2015 06:48 AM2015-06-29T06:48:05+5:302015-06-29T06:48:05+5:30
महापालिकेची केवळ मिळतकराचीच नव्हे, तर शहरात विविध ठिकाणी भाड्याने दिलेल्या जागा अथवा गाळ््यांचीदेखील कोट्यवधींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
विशाल शिर्के, पुणे
महापालिकेची केवळ मिळतकराचीच नव्हे, तर शहरात विविध ठिकाणी भाड्याने दिलेल्या जागा अथवा गाळ््यांचीदेखील कोट्यवधींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. खासगी व्यक्ती, सार्वजनिक प्रतिष्ठान ते सरकारी आस्थापनापर्यंत थकबाकी असून, बहुतांश जणांनी वर्षानुवर्षे भाडे भरलेच नसल्याचे वास्तव आहे. पालिकेची या व्यक्तींवर नक्की मेहरनजर कशासाठी, असा
प्रश्न थकबाकी पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे.
‘लोकमत’ने नुकतेच खासगी व्यक्ती वा संस्थांबरोबरच सरकारी कार्यालयांकडेदेखील मिळकतकराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे उघड केले आहे. त्या पाठोपाठ आता शहरात विविध ठिकाणी भाड्याने दिलेल्या जागा, इमारती, गाळे यांचे भाडेदेखील थकविण्यात आल्याचे समोर आले आहे. या थकबाकीदारांमध्ये विविध ट्रस्ट, कंपनी, गाळे, प्रतिष्ठान, इंडस्ट्रियल इस्टेट, विद्युत मंडळ, ग्राहक भांडार, रविवार पेठ, कोथरूड व इतर ठिकाणचे दुकानदार यांचादेखील समावेश आहे. इतकेच काय, तर सामाजिक बांधिलकी ‘प्रतिष्ठान’ असलेल्या संस्थांनीदेखील अगदी नाममात्र एक रुपया वार्षिक भाडे देखील काही नामांकित संस्थांनी थकविले आहे.
मुळातच महापालिकेचे भाडे प्रचलित दरानुसार अत्यल्प असूनही त्याचा भरणा केला नसल्याचे स्पष्ट होत आहे. अगदी साडेअकरा रुपये मासिक भाड्यापासून ते ३२, ४०, ५०, ७८, २००, ४००-४५० रुपये ते काही हजार रुपयांत भाडे आहे. शहर मध्यवर्ती ठिकाणातील मोक्याच्या जागांचे अल्प भाडे असूनही त्याची थकबाकी आढळून येत आहे. पालिकेने विविध ठिकाणी काही वर्षे मुदतीपासून ते ९९ वर्षांच्या मुदतीवर जागा आस्थापना भाड्याने दिल्या आहेत. तर काही ठिकाणी कायमस्वरूपी भाड्यावर दिलेल्या मिळकती आहेत. ‘लोकमत’कडे मार्च २०१५ अखेर थकबाकीदार असलेल्या भाडेकरूंची यादी प्राप्त झाली आहे. माहिती अधिकारात पालिकेने जून महिन्यात ही माहिती दिली असल्याने तोपर्यंतही या थकबाकीदारांनी भाड्याची रक्कम भरली नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच ही यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने त्यात उलट काही नावांची उलट भरच पडेल. माहिती
अधिकार चळवळीतील कार्यकर्ते जयप्रकाश उणेचा यांनी माहिती उजेडात आणली आहे.
नॅचरल गॅस, हंजरही थकबाकीदार
४गंज पेठेत नॅचरल गॅस कंपनीला ५ हजार ६६४ घनफूट जागा देण्यात आली असून, त्याला मासिक १ हजार ८५८ रुपये भाडे आहे. मात्र, कंपनीकडे मार्च २०१५ अखेर २ लाख ८९ हजार ८९९ रुपये थकबाकी आहे. तर, मुंबईच्या हंजर बायोटेक एनर्जी कंपनीला देवाची उरुळी फुरसुंगी येथे २० एकर जागा देण्यात आली असून, त्यासाठी मासिक ६ हजार ७४७ रुपये भाडे आकारले जाते. मात्र, कंपनीकडे १ लाख ६१ हजार ९४२ रुपयांची बाकी आहे.
विद्युत मंडळाला भरवेना नाममात्र शुल्क
४म. रा. वि. मंडळाकडे शहरात विविध ठिकाणी त्यांना ८ पैसे ते ५, ६, ७, १०, १५, १६, १२० ते ४५० रुपये इतके अत्यल्प मासिकभाडे आकारण्यात येत आहे. मात्र, तितके भाडेदेखील भरण्यात आलेले नाही. शहरातील तब्बल ६५ जागांचे भाडे थकविण्यात आलेले आहे. ही रक्कम काही हजार ते लाखाच्यावर गेलेली आहे.