आयुक्त मांडणार आज महापालिकेचे अंदाजपत्रक
By admin | Published: January 25, 2016 01:05 AM2016-01-25T01:05:11+5:302016-01-25T01:05:11+5:30
पुणे महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्ष २०१६-१७ साठीचे अंदाजपत्रक आयुक्त कुणाल कुमार सोमवारी सकाळी ११ वाजता पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्ष २०१६-१७ साठीचे अंदाजपत्रक आयुक्त कुणाल कुमार सोमवारी सकाळी ११ वाजता पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये सादर करतील. स्थायी समितीसमोर सादर होणाऱ्या या अंदाज पत्रकात एलबीटी उत्पन्नाचा तिढा, बांधकाम व्यवसायातील मंदी यामुळे उत्पन्नात होत असलेली घट त्याचबरोबर मोठ्या प्रकल्पांसाठी द्यावा लागणारा निधी याचा मेळ आयुक्त कसा घालतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
महापालिकेच्या आयुक्तांकडून सादर केले जाणारे बजेट दरवर्षी १५ जानेवारीपूर्वी मांडले जाणे आवश्यक आहे, मात्र कुणाल कुमार यांना अचानक जपानच्या दौऱ्यावर जावे लागल्याने त्यांनी बजेट सादर करण्यासाठी १० दिवसांची मुदतवाढ घेतली होती. अंदाजपत्रकाचा अखेरचा आढावा आयुक्तांनी जपानमधूनच फोन व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घेतला. १९ जानेवारी रोजी अंदाजपत्रकाचे काम पूर्ण होऊन ते छपाईसाठी पाठविण्यात आले.
राज्य शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था करातून (एलबीटी) सूट दिली. त्याबदल्यात राज्य शासनाकडून दर महिन्याला विशिष्ट रक्कम अनुदान म्हणून दिली जात आहे. पुढील वर्षी एलबीटीला पर्याय काय असणार आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे एलबीटी उत्पन्नाचे काय हा प्रश्न आयुक्तांसमोर असणार आहे. बांधकाम व्यवसायामध्ये मंदीचे वातावरण असल्याने त्यातून मिळणारे उत्पन्नही घटले आहे. मात्र त्याच वेळी पुढील वर्षातील खर्चामध्ये मोठ्या प्रकल्पांचा समावेश असणार आहे. त्यासाठी उत्पन्नवाढीचे कोणते पर्याय आयुक्त स्वीकारतात, किती रक्कम कर्जातून उभी करतात, कराचा बोजा वाढणार का, आदी प्रश्नांची उत्तरे सोमवारी सादर होणाऱ्या अंदाजपत्रकामधून मिळणार आहेत.
आयुक्तांकडून स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक सादर केल्यानंतर समितीकडून त्यामध्ये फेरबदल केले जातील. समितीकडून ११ फेब्रुवारीपर्यंत फेरबदल केलेले बजेट सादर केले जाईल. त्यानंतर ते मुख्य सभेसमोर मांडले जाईल. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आराखडा केंद्र शासनाकडे सादर करण्यासाठी आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ६ महिने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग व्यस्त होता. त्यामुळे अंदाजपत्रकासाठी पूर्वतयारी करण्याकरिता आयुक्तांना खूपच कमी वेळ मिळाला. त्यातच अंदाजपत्रकाचे काम पूर्ण करण्यासाठी कमी दिवस हाती राहिले असताना आयुक्तांना मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून जपान दौऱ्यावर जावे लागले. त्यामुळे आता यंदाच्या अंदाजपत्रकातून पुणेकरांच्या अपेक्षांची पूर्तता होते का, याकडेच लक्ष लागले आहे.
(प्रतिनिधी)