पुण्यात क्रिकेट,फुटबॉलसह मैदानी खेळांना महापालिकेची परवानगी; 'या' नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 12:16 PM2020-10-14T12:16:40+5:302020-10-14T12:19:47+5:30

व्यायामशाळा (जीम) उघडण्यास महापालिकेने मान्यता दिलेली नाही...

Municipal Corporation allows field sports including cricket and football in Pune; But strictly 'these' rules as following | पुण्यात क्रिकेट,फुटबॉलसह मैदानी खेळांना महापालिकेची परवानगी; 'या' नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक

पुण्यात क्रिकेट,फुटबॉलसह मैदानी खेळांना महापालिकेची परवानगी; 'या' नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक

Next
ठळक मुद्देसुरक्षित अंतर ठेऊन खेळता येणाऱ्या क्रीडाप्रकारांना महापालिकेची परवानगी 

पुणे : क्रिकेट, खो-खो, फुटबॉल इत्यादी मैदानी खेळांसह, ज्या खेळांमध्ये सुरक्षित अंतर राखून खेळता येणारे इनडोअर क्रीडा प्रकार म्हणजेच बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस इत्यादी क्रीडा प्रकारांना महापालिकेने मंगळवारी परवानगी दिली. यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील खेळांना परवानगी देण्याची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, अद्यापही व्यायामशाळा (जीम) उघडण्यास महापालिकेने मान्यता दिलेली नाही.  
    पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. यात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊनच सर्व खेळ खेळण्यात यावे असे नमूद केले आहे. क्रिकेट, खो-,खो सारख्या खेळांचे आयोजन करणाऱ्या आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. सरावाकरिता आवश्यक तेवढ्याच व मर्यादित खेळाडूंनाच प्रवेश देण्यात यावा. सर्वांनी मास्कचा वापर करावा़ १० वर्षाआतील मुलांना व ६५ वर्षांवरील व्यक्तींना सदर ठिकाणी प्रवेश देऊ नये. खेळाडू, कर्मचारी सर्वांची प्रवेशव्दाराजवळ थर्मल स्क्रीनिंगव्दारे तपासणी करावी. 
    इनडोअर हॉलमध्ये खेळांचा सराव करताना दारे, खिडक्या उघडी ठेवावीत व ए़सी़चा वापर टाळावा़ हॉलचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे़ मैदानाच्या प्रवेशव्दाराजवळ व इनडोअर हॉलच्या ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे़ तसेच खेळांचे आयोजनासाठी कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात यावी व कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्हज, फेसशिल्ड आदी सुरक्षा साधने द्यावीत, असेही महापालिकेने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे़ 
    ----------
लक्षणे असलेल्या खेळाडूंना मान्यता नाही 
ताप, सर्दी, खोकला यासारखी कोविड-१९ ची लक्षणे असलेल्या खेळाडूंना कुठल्याही खेळासाठी परवानगी देऊ नये़ असे आदेश महापालिकेने खेळांचे आयोजन करणाऱ्या आस्थापनांना म्हणजेच क्रीडांगणे व क्रीडा संस्थांना दिले आहेत़ तसेच ज्या खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे, त्यांची सखोल माहिती कॉटॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने सदर आस्थापनांनी ठेवावी़ व कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने तथा क्रीडा विभागाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही महापालिकेने सांगितले आहे. 
-------------------------

Web Title: Municipal Corporation allows field sports including cricket and football in Pune; But strictly 'these' rules as following

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.