महापालिका रंगवणाऱ्यांना दंड करण्यासाठी स्वतंत्र पथक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 07:20 PM2018-12-01T19:20:58+5:302018-12-01T19:25:13+5:30
रस्त्यावर थुंकणाऱ्यांना जागेवर दंड करून त्या जागेची स्वच्छता करायला लावणारी मोहिम आता महापालिका मुख्यालयातही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली असून मंगळवारपासून (दि. ४) हे पथक महापालिकेच्या कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील.
पुणे : रस्त्यावर थुंकणाऱ्यांना जागेवर दंड करून त्या जागेची स्वच्छता करायला लावणारी मोहिम आता महापालिका मुख्यालयातही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली असून मंगळवारपासून (दि. ४) हे पथक महापालिकेच्या कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील.
रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर दंडाची कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या मुख्यालयातील सर्व जिने मात्र अस्वच्छ आहेत. खिडक्यांच्या कडा थुंकीने भरलेल्या आहेत. खिडक्यांच्या सज्जांवर तंबाखू, गुटखा यांचा खच साचला आहे. त्यांच्यावर मात्र कारवाई नाही असे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाने आता महापालिका मुख्यालयातही ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी ही माहिती दिली. आयुक्त सौरव राव यांच्या संमतीने क्षेत्रीय कार्यालये तसेच महापालिकेच्या सर्वच आस्थापनांमध्ये तेथील कर्मचाऱ्यांमधून पथक स्थापन करून अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोळक म्हणाले, थुंकून परिसर अस्वच्छ करण्याची ही सवय अन्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळेच घनकचरा व्यवस्थापन विभाग गंभीरपणे ही मोहिम राबवणार आहे. महापालिका मुख्यालयात कामासाठी येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यातील अनेकजण जिन्यांच्या कोपऱ्यांमध्ये, खिडक्यांमधून पिंक टाकत असतात. पथकाला यातील कोणी समक्ष दिसले की लगेचच तेथील अन्य उपस्थितांच्या साक्षीने संबधिताला दंड करण्यात येईल. त्याची पावती दिली जाईल. असे करताना कोणाशीही अरेरावी करू नये, वाद घालू नयेत, वरिष्ठांशी संपर्क साधावा अशा सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सोमवारी महापालिकेला सुटी आहे, त्यामुळे मंगळवारपासून ही मोहिम महापालिका मुख्यालयात सुरू होईल. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांमध्येही ती राबवण्यात येईल.
नोव्हेंबरपासून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने रस्त्यावर थुंकणाऱ्या, कचरा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहिम सुरू केली आहे. यात थुंकणाऱ्यांना जागेवरच १५० रूपये दंड करण्यात येतो व ती जागा स्वच्छ करण्यासाठी फडके, पाणी भरलेली बादली दिली जाते. कचरा इतस्तत: फेकणाऱ्यांना १८० रूपये दंड करण्यात येतो. त्यांनाही पावती देण्यात येते. यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातंर्गत पथके स्थापन केली आहेत. त्यांनी त्यांचे कार्यालयीन कामकाज सांभाळून उर्वरित वेळात, ही मोहिम राबवायची आहे. २ नोव्हेंबरपासून आतापर्यंत महापालिकेने ४ हजार ४४५ जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ८ लाख ५१ हजार ९८५ रूपयांचा दंड वसूल केला आहे.