महापालिकेेच्या अंदाजपत्रकाला होणार उशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:52 IST2025-01-04T13:51:10+5:302025-01-04T13:52:40+5:30
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार पालिका आयुक्तांनी १५ जानेवारीपर्यंत स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक मांडणे आवश्यक असते.

महापालिकेेच्या अंदाजपत्रकाला होणार उशीर
पुणे : पुणे महापालिकेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक काही अपरिहार्य कारणास्तव १५ जानेवारीनंतर सादर करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती गेल्यानंतर ठरवून दिलेल्या मुदतीत महापालिकेचे अंदाजपत्रक सादर न करण्याची तत्कालीन आयुक्तांनी सुरू केलेली ‘परंपरा’ यंदाच्या वर्षीदेखील कायम राहणार आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार पालिका आयुक्तांनी १५ जानेवारीपर्यंत स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक मांडणे आवश्यक असते. मात्र, महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्याने गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेचा सर्व कारभार हा पालिका आयुक्तांच्या हातात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या मुख्य सभेच्या ठरावाला बगल देऊन पालिका आयुक्त आपल्या पद्धतीनेच अंदाजपत्रक सादर करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी १५ जानेवारीनंतरच स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करण्याची परंपरा सुरू केली आहे.
आगामी आर्थिक वर्षासाठीचे (२०२५-२६) अंदाजपत्रक काही अपरिहार्य कारणास्तव १५ जानेवारीपर्यंत सादर करता येणार नाही. त्यामुळे स्थायी समितीला १५ जानेवारीनंतर अंदाजपत्रक सादर करण्याची मान्यता द्यावी, असे पत्र महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवले होते. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाचे २०२५-२६ चे अंदाजपत्रकदेखील मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे.