महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या १० कोटी रूपयांचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 09:01 PM2018-03-21T21:01:38+5:302018-03-21T21:01:38+5:30
प्रत्येक ग्रामपंचायतीचा काही निधी बँकेत ठेवला होता. त्या त्या संबंधित बँकांनी हा निधी परत देण्यास नकार दिला आहे.
पुणे : न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या एकत्रित अशा १० कोटी रूपयांचा घोळ सुरू आहे. या गावांचे १० कोटी रूपये विविध बँकामध्ये ठेव स्वरूपात असून ते परत देण्यास या बँकांनी महापालिकेला नकार दिला आहे. महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक वसंत मोरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला.महापालिका हद्दीत समावेश झाल्यामुळे या सर्व ग्रामपंचायती विसर्जित करण्यात आल्या. जिल्हा परिषदेकडून त्यांचे दप्तर महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीचा काही निधी होता.तो त्यांनी बँकेत ठेवला होता. त्या त्या संबंधित बँकांनी हा निधी परत देण्यास नकार दिला आहे. यातील काही बँका खासगी व काही राष्ट्रीयकृत आहेत.मोरे म्हणाले, आंबेगाव खुर्द या गावाचे उदाहरण दिले. तेथील ग्रामपंचायतीचे ५६ लाख व २३ लाख रूपये दोन वेगवेगळ्या मध्ये आहेत. महापालिका प्रशासनाने या बँकांना ग्रामपंचायतीची ठेव मागितली असता बँकांनी ती परत करण्यास नकार दिला. महापालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनीही त्याला दुजोरा दिला. सर्व ग्रामपंचायतींचा मिळून १० कोटी रूपयांचा निधी आहे. त्याची मागणी करण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत बँकांना अनेक पत्रे दिली आहेत, मात्र, त्यांच्याकडून नकारच मिळत आहे असे कळसकर यांनी सभागृहाला सांगितले.
महापौर मुक्ता टिळक यांनी याबद्धल आश्चर्य व्यक्त केले. मोरे यांनी बँकांना ठेवी हव्या असतात. या ठेवी मोठ्या रक्कमेच्या आहेत. त्यामुळे बँकां त्या सोडवत नसाव्यात, आर्थिक वर्ष अखेर असल्यामुळेही त्यांच्याकडून ठेव परत द्यायला नकार मिळत असावा. मात्र,महापालिकेला या गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी निधी हवा असल्याने प्रशासनाने हा निधी त्वरित मिळवावा, अशी मागणी त्यांनी केली. महापौरांनी आयुक्त कुणाल कुमार यांनी बँक अधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी व हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा असा आदेश दिला.