अनधिकृत सहा इमारतींवर महापालिकेचा हातोडा; धायरी येथील सव्वा लाख स्केअर फूट बांधकाम पाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:27 IST2024-12-21T13:27:08+5:302024-12-21T13:27:18+5:30
नागरिकांच्या विरोधाला न जुमानता केली कारवाई

अनधिकृत सहा इमारतींवर महापालिकेचा हातोडा; धायरी येथील सव्वा लाख स्केअर फूट बांधकाम पाडले
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील अंबाईदरा भागातील सर्व्हे नंबर ३१ मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या सहा इमारतींवर महापालिकेच्या शहर बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनच्या वतीने कारवाई करत सव्वालाख स्केअर फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेच्या जॉ कटरच्या साहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आले. जेसीबी, अतिक्रमण पोलिस कर्मचारी, तसेच बिगारी सेवकांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
या अनधिकृत इमारतींवर गुरुवारी महापालिकेच्या वतीने कारवाईस सुरुवात केली. यावेळी सुरुवातीला स्थानिक नागरिक व जागा मालकांनी या कारवाईला विरोध केला. मात्र, या विरोधाला न जुमानता महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत शांतता राखत महापालिकेने ही कारवाई पूर्ण केली. पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट गावांचा विकास आराखडा अजून तयार व्हायचा आहे. हा विकास आराखडा तयार करत असताना अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा येत आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी, तसेच बांधकाम व्यावसायिकांनी कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते करतात ‘ब्लॅकमेल’; कारवाई नावापुरतीच ...
तुमचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाकडून अनेक स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते खंडणी मागतात. खंडणी न दिल्यास महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना पाठीशी घालून या बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.