Pune: पुणे महापालिका भवनात मास्क आवश्यक; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 02:59 PM2021-12-14T14:59:56+5:302021-12-14T15:05:33+5:30
पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आल्याने अनेकांनी मास्क वापरणे आता बंदच केले आहे. तर जे मास्क घालतात, ...
पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आल्याने अनेकांनी मास्क वापरणे आता बंदच केले आहे. तर जे मास्क घालतात, ते नाका तोंडावर नव्हे, तर केवळ हनुवटीवर अथवा गळ्यात लटकवून ठेवत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिका भवनात विनामास्क प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महापालिकेमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचे रुग्ण शहरात घटले असले तरी ओमायक्रॉनचा नवीन धोका समोर उभा राहिला आहे. यामुळे बिनधास्त झालेल्या नागरिकांना संसर्ग अजून टळला नाही, याची जाणीव करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिका भवनात दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी येत असतात, अशावेळी बहुतांशी जण विनामास्क सर्वत्र फिरत असतात. यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारणीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात पुन्हा वाढताना दिसत आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांमुळेही प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून वारंवार सांगूनही अनेकजण मास्क लावण्यास टाळाटाळ करताना दिसतात. पण आता महापालिका भवनात विनामास्क प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.