पालिकेला नको आमदार निधी
By admin | Published: November 11, 2015 01:51 AM2015-11-11T01:51:56+5:302015-11-11T01:51:56+5:30
आमदार निधीतून काम करण्याची तयारी दाखवल्यानंतरही पालिका प्रशासन त्याबाबतीत काही हालचालच करायला तयार नाही.
पुणे: आमदार निधीतून काम करण्याची तयारी दाखवल्यानंतरही पालिका प्रशासन त्याबाबतीत काही हालचालच करायला तयार नाही. सलग सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेची झोळी एकतर पैशाने भरलेली असावी किंवा मग ती फाटकी तरी असावी, अशी भावना आमदार अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केली.
विधान परिषदेचे आमदार असलेले गाडगीळ यांनाआपला निधी पुणे जिल्ह्यात कुठेही खर्च करता येतो, मात्र आपण राहात असलेल्या पुण्यात काहीतरी करावे, या हेतूने त्यांनी पालिकेकडे दोन चांगल्या कामांचे प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी दिले. त्यातील एक काम ओंकारेश्वर मंदिराजवळ दशक्रिया विधीसाठी घाटावर मंडप बांधण्याचे आहे.
सध्या तिथे अशी काहीही व्यवस्था नसल्याने अशा विधीसाठी आलेल्या लोकांना उन्हातच थांबावे लागते. व्यवसायाने वास्तुविशारद असल्याने गाडगीळ यांना नदीपात्रात बांधकाम करण्यासाठी असलेल्या निर्बंधाची माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी या निर्बंधांची अडचण होणार नाही, अशा दृष्टिने स्वत: या नियोजित मंडपाचे आरेखन करून दिले.
यासाठी आपला निधी वापरण्याचे लेखी पत्रही पालिका प्रशासनाला दिले. मात्र त्याला आता सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊन गेला तरीही प्रशासनाकडून अद्याप काहीही हालचाल झालेली नाही अशी त्यांची तक्रार आहे.
स्मार्ट सिटी मध्ये गुंतलेल्या आयुक्तांना अशा लहान कामांमध्ये रस नसावा, आमदार निधीसाठी अनेकजण प्रयत्नशील असताना पालिकेचा हा सुस्तपणा अनाकलनीय आहे, असे मत गाडगीळ यांनी व्यक्त केले.